Pimpri : साईड मागीतल्यावरुन स्कूल व्हॅनची तोडफोड

एमपीसी न्यूज – भर रस्त्यात उभ्या असलेल्या कारचालकाला साईड मागिल्यावरून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने स्कूल व्हॅन चालकाशी अरेरावी करत व्हॅनची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास नाणेकरचाळ येथे घडली.

विजय प्रभाकर बानायत (वय 32, रा. पिंपरीगाव) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पाच ते सहा जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय हे स्कूल व्हॅन चालवतात. ते मंगळवारी रात्री स्कूल व्हॅनमध्ये इंधन भरण्यासाठी जात होते. नाणेकर चाळ येथे रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाची कार भर रस्त्यात उभी होती. त्यामुळे स्कूल व्हॅनला पुढे जाण्यास अडथळा येत होता. त्यामुळे विजय यांनी हॉर्न वाजवून त्यांना कार बाजूला घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने कार मधील पाच ते सहा तरुण विजय यांच्याकडे धावून आले. विजय आणि आरोपी यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यातच मद्यधुंद अवस्थेत आरोपी असल्याने घाबरून विजय यांनी व्हॅन सोडून पळ काढला. त्यानंतर आरोपींनी स्कूल व्हॅनची तोडफोड करीत परिसरात दहशत माजवली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.