Pimpri : उंची साडेतीन फूट पण कर्तृत्व दसपट

(श्रीपाद शिंदे)

एमपीसी न्यूज – रंग, भारदस्त शरीरयष्टी, काळेभोर केस आणि एकूणच बाह्य सौंदर्यात भर घालणारी प्रत्येक गोष्ट व्यक्तीचे केवळ बाह्यअंग खुलवते. पण, ती व्यक्ती कर्तृत्वशून्य असेल तर अशा रूपवानांना काडीचीही किंमत राहत नाही. त्याच्या दिसण्यापेक्षा त्याचं इतरांशी वागणं चांगलं असायला हवं. असेच एक जोडपे आहे. ज्यांची उंची आहे अवघी साडेतीन फूट. पण आपल्या कष्टाने, कर्तृत्वाने या दोघांनी आपल्या संसाराचा भार पेलला आहे. जागतिक अपंग दिनानिमित्त शरीराने ठेंगण्या पण कर्तृत्वाच्या उंचीने आकाशाला गवसणी घातलेल्या व्यक्तीची कथा.

छगन प्रकाश जाधव असे या व्यक्तीचे नाव आहे. जन्मताच अनोखे अपंगत्व आलेल्या छगन यांनी आज स्वबळावर स्वतःचा संसार थाटला आहे. भाचीचे लग्न केले. तसेच ते एक दुकानवजा टपरी चालवत आहेत. छगन यांचा जन्म पिंपरी-चिंचवड शहरात झाला. जन्मताच ठेंगणेपणाचे अपंगत्व आले. पण सुरुवातीची काही वर्षे याबाबत काहीच जाणवले नाही. पण, वय वाढले तसेच ही बाब प्रकर्षाने जाणवायला लागली. तरीही सर्व काही आनंदात सुरु होते.

घरी आई, वडील, आजी आणि छगन असे लहान आणि सुखी कुटुंब होते. घरी मध्यमवर्गीय वातावरण होते. हातावरचे पोट असल्याने काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. आई, वडील आणि आजी दिवसरात्र काबाडकष्ट करीत असत. सर्वांनी छगन यांना सरकारी अधिकारी बनविण्याची स्वप्ने बघितली. छगन सरकारी अधिकारी झाल्यानंतर घरातील दारिद्र्य संपेल. घर सधन होईल. त्याचबरोबर आजच्या आनंदात उद्या भर पडेल.

पण, नियतीला हे गणित मान्य नव्हते. छगन चौथीच्या वर्गात शिकत असताना आई-वडिलांचे छत्र हरपले. आई-वडिलांच्या अचानक जाण्याने छगन यांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आजीवर आली. आजीने देखील कुठेही कमी न पडता धुणी-भांडी करून छगन यांना शिकवले. त्यांचा सांभाळ केला. पण, आजीचे वय वाढत होते. तिला काम करताना पाहून छगन यांना फार वेदना होत होत्या. तिच्या कामाचा भार लवकर हलका करावा, सारे त्यांना नेहमी वाटे. पण बारा-तेराव्या वर्षात ते तरी काय काम करणार, हा देखील मोठा प्रश्न होता.

शिक्षणातील आवड दिवसेंदिवस कमी होऊ लागली. कसेबसे दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. शिक्षणातील लिहिता, वाचता येण्याची मूलभूत अडचण सुटली अन दहावीनंतर छगन यांनी 2004 साली शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला. आजीची जबाबदारी आता आपण सांभाळावी. आजवर तिने केलेल्या मेहनतीचे फळ आपण तिला द्यावे. या विचाराने छगन यांनी भोसरी एमआयडीसीमधील एका कंपनीमधून घरी जॉब बनविण्याचे काम घेतले.

कंपनीतून कच्चा माल आणायचा, त्याचे पक्के जॉब बनवून ते कंपनीला द्यायचे. एक हजार जॉब बनवून दिल्यानंतर त्याचे तीस रुपये त्यांना मिळायचे. दहावी नंतर हे काम सुरु केले होते. त्यामुळे अंगात भरपूर ऊर्जा होती. भल्या पहाटे त्यांचा दिवस सुरु व्हायचा. दिवसभर अथक काम केल्यानंतर दिवसाकाठी 80 ते 90 रुपये मिळायचे.

काही वर्ष जॉब बनविण्याचे काम केले. त्यातून ओळखी वाढू लागल्या. दररोज नवीन लोक भेटू लागले. यातूनच स्वतःचे एखादे दुकान असावे, अशी कल्पना त्यांच्या मनात आली. या कल्पनेतून त्यांनी त्रिवेणीनगर चौक, तळवडे येथे ‘सुप्रिया पान स्टॉल’ नावाने एक टपरी सुरु केली. सुरुवातीला पान टपरी म्हणून सुरु केलेल्या टपरीचे कालांतराने दुकान झाले. या दुकानात पान, चुना, कात, सुपारी, बडीशोप यांसह चॉकलेट, बिस्किटे, पापडी, पाण्याच्या बाटल्या आणि बरेच काही मिळू लागले. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी ही टपरी सुरु केली.

मागील अकरा वर्षांपासून त्यांचे दुकान सुरु आहे. सकाळी नऊ वाजता दुकान उघडायचे. दिवसभर दुकानावर काम करायचे. रात्री आठच्या सुमारास दुकान बंद करायचे. माल लागल्यास फोन केल्यानंतर डीलर जागेवर माल आणून देतात. त्यामुळे त्यांना कुठे जाण्याचीही गरज नाही. आता त्यांच्या दुकानात मोबाईल, डिश टीव्हीचे रिचार्ज देखील मिळतात. त्यांची कार्यव्यस्तता दिवसेंदिवस वाढत आहे. जुलै 2017 मध्ये त्यांनी त्यांच्या भाचीचा देखील विवाह लावून दिला. तिच्या विवाहाची सर्व जबाबदारी छगन यांनी स्वतःवर घेतली आणि ती यशस्वीपणे पार पाडली आहे.

छगन यांना एका गाडीची गरज आहे. त्यासाठी त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे अनेकवेळा अर्ज केले. पण, त्या अर्जाचे पुढे काहीच झाले नाही. महिन्या-दोन-महिन्याला ते पालिकेत चकरा मारतात आणि निराश होऊन परत जातात. या चकरा मारण्यासाठी त्यांना त्यांचे दुकान बंद ठेवावे लागते. त्या दिवसाचा त्यांचा रोजगारही बुडतो. मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी एका आमदारांच्या कार्यक्रमात देखील त्यांची मागणी मांडली होती, पण त्याचेही पुढे काही झाले नाही, अशी खंत ते व्यक्त करतात.

छगन यांचा 2013 साली पुष्पा यांच्याशी विवाह झाला. पुष्पा या देखील त्यांच्याप्रमाणेच अपंग आहेत. त्यांना मागील वर्षी पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. त्याचे नाव त्यांनी सुभाष ठेवले आहे. दीड वर्षांचा सुभाष आता रांगत आहे. कामाची धडपड छगन यांना स्वस्थ बसू देत नाही. पुष्पा घर सांभाळतात आणि छगन बाहेरची सगळी कामे करतात. छगन यांची उंची केवळ साडेतीन फूट आहे. पण, त्यांच्या कर्तृत्वाची उंची मात्र आभाळाला टेकली आहे. जबाबदारी घ्यायला त्यांना आवडते. ती पार पडताना अनेक अडचणी येतात. पण, त्या अडचणींना तोंड देण्यात एक वेगळीच मजा असल्याचे ते अभिमानाने सांगतात.

पुष्पा यांचीही उंची कमी असल्याने त्यांना देखील घरात काम करत असताना अनेक अडचणी येतात. या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी योग्य उपाययोजना देखील केल्या आहेत. स्वयंपाकाच्या ओट्यावर काम करण्यासाठी योग्य उंचीचे टेबल तयार करून घेतले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.