Pimpri: महासभेला सहा अधिकारी अन्‌ मोजकेच नगरसेवक हजर

महापालिका कामकाजावर आचारसंहितेचा परिणाम; सभा 20 एप्रिल 2019 पर्यंत तहकूब

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कामकाजावर परिणाम पडला आहे. बहुतांश अधिकारी, कर्मचा-यांना ‘इलेक्शन ड्युटी’ लागली आहे. त्यामुळे आज (बुधवारी) झालेल्या महासभेला केवळ सहा अधिकारी आणि मोजक्याच नगरसेवकांची हजेरी होती. दरम्यान, ही सभा 20 एप्रिल 2019 पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. तसेच आजची स्थायी समितीची साप्ताहिक सभा देखील तहकूब करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची मार्च महिन्याची सभा आज आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा धर यांच्या मुलाला सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रद्धांजलीपर भाषणे झाली.

  • यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, ”राजकीय वलय असले तरी मनोहर पर्रिकर शेवटपर्यंत सामान्य कार्यकर्ता म्हणून वागले. आदर्श नेता आणि चांगला कार्यकर्ता होते. संरक्षणमंत्री असताना त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील रेडझोन, बोपखेल पुलासह संरक्षण विभागासंदर्भातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या जाण्याने चांगल्या राजकीय कार्यकर्त्यांची हानी झाली आहे”.

सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, मनोहर पर्रिकर यांनी सामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री असे राजकारणात उत्तुंग यश मिळविले. मुख्यमंत्री असतानाही त्यांचे पाय जमिनीवर होते. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते सामान्य मानसात मिसळून राहिले. त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीकोन होता. माणूसपण जपणारा नेता होता. त्यांच्या जाण्याचे भाजपची हानी झाली आहे.

  • महापौर राहुल जाधव म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्ता अशी शेवटपर्यंत मनोहर पर्रिकर यांची ओळख होती. मुख्यमंत्री, देशाचा संरक्षणमंत्री अशी मोठी पदे भूषविली. तरीही त्यांच्यातील कार्यकर्ता जिवंत होता. साध्या माणसांमध्ये मिसळण्याचा त्यांचा गुण कौतुकास्पद होता. साधी राहणी उच्च विचारसरणी याप्रमाणे ते राहिले. त्यांच्या जाण्याचे देशाचे मोठे नुकसान झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.