Alandi : ज्येष्ठ नागरिकाला हप्ता मागितल्या प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – भाड्याच्या खोल्या असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरात घुसून एकाने हप्ता मागितला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गोपाळपुरा आळंदी येथे बुधवारी (दि. 20) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

रामदास वामन बनसोडे (वय 63, रा. गोपाळपुरा, आळंदी) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दिगंबर उर्फ दिग्या विठ्ठल कदम (रा. गोपाळपुरा, आळंदी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बनसोडे यांच्या गोपाळपुरा येथे खोल्या आहेत. त्या खोल्या त्यांनी भाड्याने दिल्या आहेत. बुधवारी सकाळी बनसोडे आणि त्यांच्या पत्नी घरात असताना आरोपी दिग्या जबरदस्तीने घरात घुसला. ‘तुझ्या खोल्या भाड्याने आहेत. तू मला 50 हजार दे किंवा दर महिन्याला तीन हजार रुपये हप्ता दे. नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही.’ अशी धमकी दिग्या याने बनसोडे यांना दिली. तसेच त्यांना मारहाण केली. बनसोडे यांचा भाडेकरू सुनील चेके यांना देखील ‘बनसोडे यांचा खून करणार आहे, त्यांच्यासोबत गाडीवर फिरू नकोस’ असे सांगितले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.