Pimpri : पिंपरीतील संवेदनशील भागात अन् गुन्हेगारांवर करडी नजर ठेवा – श्रीरंग बारणे

खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

एमपीसी न्यूज- पिंपरी विधानसभा मतदारसंघात पैशांचा मोठा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पैशाचा वापर करणा-यांवर लक्ष ठेवण्यात यावे. मतदारसंघातील झोपडपट्यांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा. गुन्हेगारांवर करडी नजर ठेवावी. खुल्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यात यावी. मतदारांवर दहशत होता कामा नये, अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पोलीस आयुक्तांना केल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी उद्या सोमवारी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी विधानसभा मतदारसंघातील झोपडपट्ट्यांमध्ये पैशांचे वाटप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासदार बारणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज (रविवारी) पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची भेट घेतली. यावेळी खासदार अमर साबळे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे उपस्थित होते.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात झोपडपट्यांचा समावेश आहे. त्यामध्ये आनंदनगर, इंदिरानगर, लालटोपीनगर, रमाबाईनगर, दत्तनगर, विद्यानगर, भाटनगर हा भाग येतो. याभागात पैशांचा मोठा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा. पैशांचा वापर करणा-या मंडळींची नावे पोलिसांना दिली आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात यावे, अशा सूचना दिल्याचे बारणे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांचा वावर चालू आहे. गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्यात यावी. खुल्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यात यावी. मतदारांवर दहशत होता कामा नये, अशा सूचनाही बारणे यांनी पोलीस आयुक्तांना केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.