Pimpri: स्थायी समिती सभा सलग दोनदा तहकूब; विषयांवरुन सत्ताधा-यांमध्ये होईना एकमत ?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक नाड्या हातात असलेली सर्वात शक्तीशाली स्थायी समितीची सभा सलग दोनवेळा तहकूब झाली आहे. सभेच्या विषयपत्रिकेवर सुमारे दोनशे कोटीच्या आसपास विषय मान्यतेसाठी ठेवण्यात आले आहेत. तरी, देखील सलग दोनदा स्थायी समितीची सभा तहकूब झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून विषयांवरुन सत्ताधा-यांमध्ये एकमत होत नसल्याने सभा तहकूब केली जात असल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

महापालिकेची 26 डिसेंबर 2018 रोजीची गणसंख्ये अभावी तहकूब केलेली आणि या आठवड्याची साप्ताहिक स्थायी समितीच्या सभेचे आज (मंगळवारी) आयोजन करण्यात आले होते. सभापती ममता गायकवाड सभेच्या स्थानी होत्या. अभिनेते कादर खान आणि नगरसेवक बाबू नायर यांचे वडील एम. शंकरनारायणन नायर यांना श्रद्धांजली वाहून दोन्ही सभा शुक्रवार (दि.4)दुपारी दीड वाजेपर्यंत तहकूब करण्यात आल्या आहेत.

आकुर्डी, पिंपरीतील गृहप्रकल्प (84 कोटी), वायसीएमएच्‌ रुग्णालयातील पदव्युत्तर अभ्यासाक्रमासाठी आवश्यक कामे करणे (32 कोटी), च-होली येथील चोविसवाडी, वडमुखवाडी 18 मीटर रस्ता विकसित करणे (19 कोटी 72 लाख रुपये), विशालनगर जगताप डेअरी ते मुळा नदीवरील पुला पर्यंतचा 24 मीटर रुंद रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करणे  (14 कोटी 40 लाख 66 हजार रुपये), आकुर्डी रेल्वे स्टेशन ते गुरुद्वार चौका पर्यंतचा 18 मीटर रस्ता अर्बन डिझाईननुसार विकसित करणे (आठ कोटी 91 लाख रुपये)असे सुमारे दोनशे कोटीच्या आसपास विषय स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आले आहेत.

पंरतु, कोणतेही सबळ कारण न देता सलग दोनवेळा स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली आहे. यामुळे आवास योजनेसह विविध महत्वाचे विषय लांबणीवर पडले होते. दरम्यान, आजच्या स्थायी समितीसमोर आयत्यावेळी महापालिकेच्या महत्वाच्या मिळकतींवर डॉग स्कॉडमार्फत सुरक्षा व्यवस्था करणे, महापालिकेच्या रुग्णालयातील डी.आर सिस्टिमकरिता एक्स-रे फिल्म खरेदी करणे, पवनाथडी जत्रेच्या सभा मंडपासाठी 32 लाख देणे असे विविध विषय दाखल करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.