Pimpri :10 लाख रुपयांपर्यंत महापालिकेला कामे सुचवा; त्या सूचनांचा 2024-25 च्या अंदाजपत्रकात करणार समावेश – आयुक्त शेखर सिंह

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य महापालिका (Pimpri) आहे. महानगरपालिका हद्दीत राहणा-या नागरिकांच्या सुविधांसाठी महानगरपालिकेने पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकात नागरिकांनी सुचविलेल्या कामाचा समावेश करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

त्यानुसार 2024 – 25 च्या अंदाजपत्रकासाठी नागरिकांकडून सूचना अर्ज स्विकारण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.

सन 2007 पासून महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करताना नागरिकांच्या (Pimpri )सुचनेनुसार आवश्यक कामांचा अंतर्भाव अंदाजपत्रकात करणे, असा उपक्रम महापालिका राबवते. त्यासाठी वर्तमानपत्रात प्रसिध्दी करून नागरिकांना कामेसुचविणेबाबत जाहिर आवाहनही करण्यात येते. त्याच धर्तीवर सन 2024 -25 चे अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे.

Mumbai : सागरी व्यापार क्षेत्रातील गुंतवणूकदारांना भारतात मोठी संधी – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

कुठे व कधी करणार अर्ज/ कुठे सुचविणार सूचना

सर्व क्षेत्रिय समितीमध्ये सन 2024 -25 चे अंदाजपत्रक तयार करताना नागरिकांनी सुचविलेली कामे विचारात घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नागरिकांना त्यांच्या क्षेत्रिय कार्यालयातील/वॉर्डातील कामे सुचविण्याबाबत, आपल्या परिसराच्या गरजेनुसार आवश्यक व योग्य कामांचा समावेश अंदाजपत्रकात करण्यासाठी नागरिक सूचना करू शकतात. त्यासाठी विहीत नमुन्यातील “नागरिक सूचना अर्ज ” प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये विनामुल्य वाटपाकरीता उपलब्ध असतील तसेच म.न.पा. वेबसाईट www.pcmcindia.gov.in वर देखील नागरिकांचे सूचना अर्ज 10 नोव्हेंबर 2023 रोजी सायं 5.00 वाजेपर्यंत संबंधित क्षेत्रिय कार्यालयात तमेच ई-मेलवरही स्वीकारण्यात येतील. संबंधित क्षेत्रिय अधिकारी व कार्यकारी अभियंता हे सुचविलेल्या कामांची शहानिशा करून योग्य असलेल्या विकास कामांचा समावेश अर्थसंकल्पात करतील.

कामे सुचविताना याची घ्या दक्षता

महापालिकेच्या वतीने नागरिकांनी सुचना अर्ज 2024 -25 भरताना घ्यावयाच्या काळजी बाबतही सूचना देण्यात आल्या आहेत ज्यामध्ये सूचना अर्जात कामे सुचविताना जसे पूल, उड्डाणपुल, नवे रस्ते, भवन बांधकाम इ. मोठी कामे सुचवू नयेत. या उपक्रमात काम सुचविण्याची मर्यादा ही केवळ 10 लाखाची आहे याची नोंद घ्यावी. तसेच सुप्रिम कोर्टाने अवैध ठरविलेली कामे करण्याबाबतच्या सूचना महानगरपालिकेला स्वीकारता येणार नाहीत, नागरिक सूचना मध्ये कामाचे स्वरुप व स्थान अचूकपणे लिहावे. नागरिकांनी सूचना अर्जातील कोष्टक 1 आणि 2 नुसार कामाचा सांकेतिक क्रमांक नमूद करावा.

नागरिकांनी सूचना अर्ज भरण्याआधी क्षेत्रीय कार्यालय / सारथी हेल्प लाईन (8888006666) वर संपर्क साधल्यास आपल्या सूचना अर्जासंबंधी माहिती मिळण्यास मदत होऊ शकते, नागरिक सूचना अर्ज हे कूठल्याही क्षेत्रीय कार्यालयासाठी सादर करू शकतात, यासाठी केवळ संबधित (म्हणजे ज्या कार्यालयाच्या अखत्यारीतील काम आहे त्याच) क्षेत्रीय कार्यालयात अर्ज सादर करावा. इतर कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयात अर्ज सादर केल्यास तो निवड प्रक्रियेत ग्राह्य धरला जाणार नाही. आपल्या अर्जाचा जो दाखल क्रमांक असेल त्यांच्या आधारे हे काम अंदाजपत्रकात स्वीकारले गेले किंवा नाही व नसल्यास त्याबाबतची कारणे कळू शकतील.

सहभागी अंदाजपत्रकात नागरिक, सुचना अर्ज एक व्यक्ती एका कामासाठी एकच अर्ज भरू शकते तथापि एक व्यक्ती अनेक कामांसाठी अधिक अर्ज भरू शकते. त्यानुसार शहरवासियांनी उपयुक्त सूचना कराव्यात त्यांच्या सूचनांचे स्वागत करण्यात येईल असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.