Pimpri : महापालिका आयुक्तांच्या बदलीची चर्चा; पीएमआरडीएच्या आयुक्तपदी वर्णी लागण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली होणार असल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. ‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष किरण गित्ते यांचा प्रतिनियुक्तीचा पाच वर्षांचा कार्यकाल संपुष्टात आला असून त्यांच्या जागी महापालिका आयुक्त  हर्डीकर यांची बदली होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर पहिले आयुक्त होण्याचा मान महेश झगडे यांना मिळाला. मात्र, अल्पावधीतच त्यांची बदली झाल्याने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी सलगी असणा-या किरण गित्त्ते यांची नियुक्ती झाली होती. गित्ते हे त्रिपुरा केडरचे सनदी अधिकारी असून महाराष्ट्र केडरमध्ये ते 2014 मध्ये प्रतिनियुक्तीवर दाखल झाले. त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला असून गित्ते पुन्हा त्रिपुरा राज्यात परतणार आहेत.

महापालिकेत भाजपची सत्ता येताच श्रावण हर्डीकर यांची नागपूरहून पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली. 27 एप्रिल 2017 रोजी आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेणा-या हर्डीकर यांची दोन वर्षांची कारकिर्द वादग्रस्त राहिली आहे. गतिमान, कार्यक्षम प्रशासन आणि पारदर्शक कारभारावर भर देऊ असे जाहीर करणा-या हर्डीकर यांच्या राजवटीत सर्वाधिक गडबड घोटाळे झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. ते भाजपधार्जिणे असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी वेळोवेळी केली आहे.  भाजपचे दलाल, भाजपचे घरगडी, प्रवक्ते विरोधकांच्या या ‘शेलक्या’ विशेषणांमुळे  हर्डीकर अस्वस्थ आहेत.

आगामी निवडणूकीत आपल्याला अधिक लक्ष्य केले जाईल, याची चिंता त्यांना सतावत आहे. त्यामुळेच ते  निवडणुकांपुर्वीच बदली व्हावी यासाठी  प्रयत्नशील असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. पीएमआरडीएच्या रिक्त पदासाठी त्यांनी प्रयत्न चालविल्याचे बोलले जात असून महापालिका वर्तुळात याबाबतच्या चर्चांना उधान आले आहे.

दरम्यान, बदलीबाबत विचारले असता आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या वृत्ताचे खंडण केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.