Pimpri: शहरातील आणखी आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; तर तिघांचे 14 दिवसांनंतरचे रिपोर्टही पॉझिटीव्ह

आजपर्यंत 115 जणांना कोरोनाची लागण; 31 जण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी, रुपीनगर परिसरातील आणखी आठ जणांचे आज (बुधवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीबाहेरील काही रुग्ण आहेत. तर, 14 दिवसांचे उपचार घेतलेल्या तीन जणांचे रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे. शहरातील कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांचा आकडा 80 वर पोहचला असून आजपर्यंत 115 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 31  जण कोरोनामुक्त झाले असून चौघांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेने मंगळवारी (दि. 28) 179 जणांचे  नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट आता आले आहेत. त्यामध्ये रुपीनगर भागातील चार आणि काळेवाडीतील दोन रुग्णांचा समावेश आहे. हाय रिस्क कॉन्टॅकटमधून यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, महापालिका हद्दीबाहेरील दोन रुग्ण आहेत. याशिवाय महापालिका रुग्णालयात 14 दिवसांचे उपचार घेतल्यानंतरही तिघांचे रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे प्रशासनाची मात्र चिंता वाढली आहे.

मागील 22 दिवसांत 90  नवीन रुग्णांची भर!

शहरात 8 एप्रिल पासून दररोज कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण येत आहेत. 8 एप्रिलला एक, 9 ला तीन, 10 एप्रिल रोजी चार, 11 एप्रिलला दोन , 12 एप्रिलला पाच, 13 एप्रिल रोजी दोन, 14 एप्रिल  रोजी एकाच दिवशी सहा, 15 एप्रिल रोजी चार, 16 एप्रिल रोजी चार, 17 एप्रिल रोजी दोन, 18 एप्रिल रोजी सात, 19, 20, 21  एप्रिल रोजी प्रत्येकी एकाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.  22 एप्रिल रोजी तीन, 23 एप्रिल रोजी तीन रुग्ण,   24 एप्रिल रोजी  एकाच दिवशी 11 रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. 25 एप्रिल रोजी दोन, 26 एप्रिल रोजी एक,  27 एप्रिल रोजी 11 आणि 28 एप्रिल रोजी 11 आणि आज 29 एप्रिल आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने मागील 21 दिवसात तब्बल 90 नवीन रुग्णांची भर पडली आहे.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील आणि शहराबाहेरील पण शहरात उपचार सुरू आहेत अशा 115  जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 31  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 80 रुग्ण शहरात आहेत. त्यातील 74 रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तर शहरातील दहा रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महापालिका हद्दीबाहेरील एक आणि पुणे जिल्ह्या बाहेरील दोन अशा तीन रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, रविवारी (दि.12) थेरगाव भागातील एका पुरुषाचा, सोमवारी (दि.20) निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि शुक्रवारी (दि. 24)  निगडीतील एका पुरुष रुग्णाचा अशा चार जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.