Pimpri : रस्त्याने पायी जाणा-या नागरिकांना लुटणा-या तिघांना बेड्या

पिंपरी पोलिसांची कामगिरी; पावणे दोन लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जाणा-या नागरिकांना अडवून त्यांना मारहाण करत लुटणा-या तीन जणांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 84 हजार 850 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

विजय उर्फ बन्या दत्तात्रय सरोदे (वय 21, रा. ओटा स्कीम निगडी), विजय म्हसु कांबळे (वय 28, रा. ओटा स्कीम निगडी), किशोर नारायण ढवळे (वय 28, रा. पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

हर्षद कुंभार हा तरुण त्याच्या मित्रांसोबत शुक्रवारी (दि. 22) संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास एच ए मैदानाच्या कोप-यावर थांबला होता. त्यावेळी आरोपी तिघे दुचाकीवरून आले. त्यातील एकाने ‘अंगावर का थुंकलास’ असा बहाणा करून हर्षद यांच्या मित्राला मारहाण करून मोबाईल फोन हिसकावला. हे भांडण सोडविण्यासाठी हर्षद गेले असता आरोपींनी त्यांना एका धारदार वस्तूने मारून जखमी केले. आरोपींनी हर्षद यांचा मोबाईल फोन आणि 600 रुपये रोख रक्कम असा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी आरोपी विजय सरोदे याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

पिंपरी पोलिसांनी आरोपी विजय सरोदे याला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असता पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करून त्याचे इतर दोन साथीदार विजय कांबळे आणि किशोर ढवळे यांना अटक केली. तिन्ही आरोपींनी हर्षद कुंभार यांना मारहाण करून लुटल्याची कबुली दिली. तसेच अन्य ठिकाणी देखील नागरिकांना अडवून लुटल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक मोपेड दुचाकी, 16 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 84 हजार 850 रुपयांचा ऐवज जप्त केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख तपास करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस कर्मचारी राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, जावेद बागसिराज, महादेव जावळे, अजिनाथ सरक, श्रीकांत जाधव, प्रतिभा मुळे, रमेजा गोलंदाज, गणेश परदेशी, रोहित पिंजरकर, उमेश वानखडे, सोमेश्वर महाडिक, देवा राऊत यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.