Pimpri: भोसरीतील रुग्णालय खासगीकरणाचा विषय रद्द करा; मनसेची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे भोसरीत उभारण्यात आलेल्या सुसज्ज रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा घाट भाजपने घातला आहे. सत्ताधा-यांनी सुसज्ज रुग्णालयाचे खासगीकरण करण्यास गदारोळात महासभेची मंजुरी घेतली आहे. रुग्णालयाच्या खासगीकरणास मनसेचा विरोध असून हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) केली आहे.

याबाबत अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. सत्ताधारी पक्षाने कोणत्याही नगरसेवकांचे म्हणणे न ऐकता रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा विषय मंजूर करून घेतला. या विषयामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे रुग्णालय खाजगी संस्थेस देण्यास आमचा विरोध आहे. हे रुग्णालय कोणत्या संस्थेस चालवण्यास देणार आहे, याची माहिती नाही, रुग्णालय खासगी संस्थेस 30 वर्ष चालविण्यासाठी देण्यात येणार असून त्याला विरोध आहे.

या रुग्णालयामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक यांच्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहे. परंतु, शहरातील सर्व नागरिकांना उपचार व सोयी-सुविधा मोफत मिळावेत. यासाठी वायसीएमएचच्या धर्तीवर भोसरीतील रुग्णालय चालविण्यात यावे. रुग्णालयाच्या खासगीकरणामुळे महापालिकेला कोणतेही उत्पन्न मिळणार नाही. त्यामुळे गदारोळात मंजूर केलेला रुग्णालयाच्या खासगीकरणाचा विषय रद्द करुन पुन्हा महासभेत चर्चेसाठी आणावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखील शिष्टमंडळात रूपेश पटेकर, राजू सावळे, सुरेश सकट, के.के.कांबळे, रवी जाधव, मीना गटकळ, सीमा बेलापुरकर, रूपाली गिलबिले, स्नेहल बांगर, अनिता पांचाळ, संगीता देशमुख, दक्षता क्षीरसागर, प्राजक्ता गुजर, पंकज दळवी, गणेश पाटील, रोहित काळभोर, मयूर हजारे सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.