Pimpri : मावळ लोकसभा मतदारसंघात जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करणार – पार्थ पवार

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे, हे दिसून येत आहे. अनेक कंपन्या काही कारणांमुळे बंद झाल्या. मात्र, आता मावळमध्ये अनेकानेक कंपन्या आणून येथील स्थानिक लोकांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देणार आहे. कंपनी आणि कामगार यांच्यात समन्वय साधून कामगारांचे सगळे प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी दिले.

तळेगाव दाभाडे येथे मावळ परिसरातील पंधरा कारखान्यातील इंटक युनियनच्या प्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्या आयोजित करण्यात आलेल्या मिटिंगमध्ये ते बोलत होते. इंटकचे जिल्हाध्यक्ष विजय काळोखे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. यावेळी मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, इंटक संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस गोविंदराव मोहिते, नगरसेवक संतोष भेगडे व विविध कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

  • इंटक संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले, मावळ परिसरात अनेक एमआयडीसी आहेत. मात्र, स्थानिक तरुणांना या कंपन्या डावलून परराज्यातील तरुणांना रोजगार देतात. तर काही कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांचा पगार हा अतिशय कमी आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मावळ लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. हा प्रश्न मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी सोडवावेत. स्थानिक कामगारांना पार्थ पवार यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आणि त्या अपेक्षेला ते नक्कीच खरे उतरतील, अशी आशा यावेळी गोविंदराव मोहिते यांनी व्यक्त केली.

यावेळी पार्थ पवार म्हणाले, भाजप सरकारने मागील पाच वर्षात भारताची अर्थव्यवस्था बिघडवली आहे. आपल्या देशावर 40 लाख कोटी इतकं कर्ज होत. मात्र, भाजपच्या काळात हेच कर्ज 80 लाख कोटी इतकं झालं आहे. मागील पाच वर्षात नोटबंदी, जीएसटी यासारख्या गोष्टी आल्या. त्यामुळे याचा त्रास सर्वसामान्य नागरिकाला झाला. शिवाय याचा फटका कंपन्यांना देखील बसला आहे. उत्पादन नसल्यामुळे कामगार कमी केले जातात. तसेच कामगारांना पगार कमी दिले जातात, अशी कारण कंपन्यांकडून दिली जातात. मात्र, ज्या कंपन्यांचा उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे तरी देखील तेथील कामगारांना पगार कमी दिले जातात. असे का होते? याचा खोलात जाऊन अभ्यास करणार आहे.

  • कामगारांच्या बाजूने प्रश्न मांडून तोडगा काढणार आहे. तसेच कंपन्यांची देखील बाजू कामगारांसमोर मांडणार आहे. बाहेर राज्यातील कंपन्या मावळात येतील, असे प्रयत्न करणार आहे. त्यासाठी सर्वांचा समन्वय साधून माझ्या मतदारसंघात काम करणार आहे. मतदारसंघात अधिकाधिक रोजगार आणण्यासाठी मला साथ द्या, असे आवाहन देखील यावेळी पार्थ पवार यांनी कामगारांना केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.