Chinchwad : शहर सील केल्यानंतरही कारवाईचा वेग मंदावेना; सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंगळवारी 415 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – सरकारी आदेशाचे उल्लंघन करून जीवनावश्यक वस्तू आणि सेवा यांच्या व्यतिरिक्त इतर दुकाने उघडी ठेवल्यास, विनाकारण घराबाहेर फिरल्यास, जमाव केल्यास पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. (दि. 21) मंगळवारी 415 जणांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. शहर सील करूनही नागरिक घराबाहेर पडतच आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईचा वेग काही केल्या मंदावत नसल्याचे चित्र दिसत आहे.

एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्व शॉपिंग मॉल, दुकाने, आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. अत्यावश्यक किराणा सामान, दूध, भाजीपाला, औषधे आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत. मात्र, शासनाच्या आदेशाकडे कानाडोळा करून काही दुकानदार दुकाने सुरूच ठेवत आहेत. त्या दुकानदारांना समजावण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. समज देऊनही दुकाने सुरु ठेवल्यास पोलिसांकडून संबंधित दुकानदारांवर कठोर कारवाई केली जात आहे.

शहरे सील केल्यानंतर नागरिकांवर आणखी बंधने येतील. अत्यावश्यक वस्तूंची दुकाने देखील अगदी कमी कालावधीसाठी सुरू ठेवली जात आहेत. अत्यावश्यक वस्तू आणि सेवा यांच्यावर देखील बंधने आली. याव्यतिरिक्त अन्य सर्व सेवा, आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे काही कारणच नाही. असे असले तरी देखील शहर पूर्ण सील केल्यानंतर नागरिक जास्त घराबाहेर फिरत असल्याचे कारवाईचे आकडे सांगत आहेत.

विनाकारण घराबाहेर फिरणे, एका ठिकाणी गर्दी करणे अशा कृत्यांवर देखील पोलीस बारीक लक्ष ठेऊन आहेत. असे प्रकार निदर्शनास येताच त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. मंगळवारी पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे एमआयडीसी भोसरी (11), भोसरी (21), पिंपरी (6), चिंचवड (24), निगडी (15), आळंदी (5), चाकण (5), दिघी (15), म्हाळुंगे चौकी (1), वाकड (30), सांगवी (2), हिंजवडी (68), देहूरोड (2), तळेगाव दाभाडे (16), तळेगाव एमआयडीसी (3), चिखली (44), रावेत चौकी (5) एकूण 273 जणांवर कारवाई करण्यात आली.

तर सीआरपीसी 149 प्रमाणे एमआयडीसी भोसरी (72), पिंपरी (8), भोसरी (3), निगडी (10), दिघी (6), सांगवी (2), तळेगाव दाभाडे (17), चिखली (7), शिरगाव चौकी (8) एकूण 133 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त चिखली, तळेगाव दाभाडे, दिघी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक, चाकण दोन, पिंपरी पोलीस ठाण्यात चार मुंबई पोलीस कायदा कलम 65 ख, ड, ई, फ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.