Pune News : थकित मिळकतकर धारकांच्या मालमत्तांचा होणार लिलाव !

एमपीसी न्यूज : गेल्या अनेक वर्षांपासून मिळकतकराची देय रक्कम न भरलेल्या व त्यामुळे मालमत्तांवर बोजा चढविलेल्या मिळकतधारकांच्या मालमत्तांचा लिलाव करून वसुली करण्याचे महापालिकेच्या विचाराधीन आहे. कर आकारणी आणि कर संकलन विभागाला तशी सूचना देण्यात आली आहे.

या संदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार म्हणाले, पहिल्या टप्प्यामध्ये लाखो रुपयांची थकबाकी असलेल्या व्यावसायिक मिळकतींची यादी करण्यात येणार आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख आर्थिक स्त्रोत असलेल्या मिळकतकराची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे.

थकबाकी वसुलीसाठी सध्या अभय योजना राबविण्यात येत आहे. अभय योजनेचा कालावधी 26 जानेवारी रोजी संपुष्टात येणार आहे. अभय योजना राबवूनही थकबाकीची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मिळकतधारकांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचे महापालिकेच्या विचाराधीन आहे.

_MPC_DIR_MPU_II

महापालिकेकडून आत्तापर्यंत केवळ मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. कायद्याातील तरतूदीनुसार थकबाकी असलेल्या मालमत्तांचा लिलाव करता येऊ शकतो. त्यानुसार कर आकराणी आणि कर संकलन विभागाला त्याबाबतची सूचना देण्यात आली आहे.

जप्तीची कारवाई केल्यानंतर अनेकदा थकबाकीदारांकडून रक्कम भरण्याची तयारी दर्शविली जाते. सध्या अभय योजना राबविण्यात येत असल्यामुळे तातडीने ही कारवाई करण्यात येणार नाही. मात्र, पहिल्या टप्प्यात व्यावसायिक वापर असलेल्या मालमत्तांची विक्री करण्यात येईल, असेही खेमनार यांनी स्पष्ट केले.

वर्षानुवर्षे लाखो रुपयांची थकबाकी असलेल्या व्यावसायिक मिळकती किती आहेत, त्यातील किती जणांनी कर भरला, त्याची यादी केली जाईल. त्यानुसार सध्या वापर सुरू असलेल्या मात्र मिळकतकर थकबाकी न भरणाऱ्या यातील व्यावसायिक मिळकतींच्या मालमत्तांची विक्री केली जाईल. त्यातून थकित रकमेची वसुली केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.