PMPML : शहरातील 83 बीआरटी बस थांबे होणार चकाचक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील (PMPML) विविध मार्गावरील बीआरटी बस थांबे अस्वच्छ झाले असून धुळीने माखले आहेत. त्यामुळे पीएमपीएमएलच्या पिंपरी आगाराच्या वतीने शहरातील बीआरटी बस थांबे स्वच्छतेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत विविध मार्गावरील 83 बीआरटी बस थांब्यांची स्वच्छता केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात प्रवासी सेवेसाठी पीएमपीएमएल ही सार्वजनिक वाहतूक यंत्रणा कार्यरत आहेत. पीएमपीमधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. शहरात निगडी ते दापोडी, काळेवाडी ते स्पाइन रोड, सांगवी ते किवळे, नाशिक फाटा ते वाकड अशा चार मार्गावर बीआरटी सुरू आहे. या मार्गावर 83 बीआरटी बस थांबे आहेत. बीआरटी बस थांबे अस्वच्छ झाले असून धुळीने माखले आहेत. तसेच काही प्रवाशांनी मावा, तंबाखू आणि गुटखा खाऊन पिचकऱ्या मारत बस थांबे अस्वच्छ केले आहेत.

Chinchwad : पिंपरी चिंचवडच्या साहित्य संवर्धन समितीच्या साहित्यिकांनी वाहिली दिग्गजांना श्रद्धांजली

या अस्वच्छतेमुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात होती. याची दखल घेऊन पीएमपीएमएलच्या पिंपरी आगाराच्या वतीने शहरातील बीआरटी बस थांबे स्वच्छतेसाठी विशेष (PMPML) मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी पिंपरी आगार व्यवस्थापक भास्कर दहातोंडे यांच्या संकल्पनेतून डी.एम.ई. रामकुमार माने, मुलानी फिटर यांनी सर्व्हिस व्हॅन कम वॉशिंग व्हॅन तयार केलेली आहे. या व्हॅनमध्ये दोन हजार लिटर पाण्याची क्षमता असलेली टाकीची आणि मोटरची व्यवस्था करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना पिंपरी आगाराचे व्यवस्थापक भास्कर दहातोंडे म्हणाले, शहरातील चार बीआरटी मार्गावर 83 बस थांबे आहेत. हे बस थांबे स्वच्छ करण्याची मोहीम सोमवार (दि.9) पासून निगडीतून सुरुवात केली आहे. प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी टप्प्या-टप्याने सर्वच बस थांबे रात्रीच्या वेळी स्वच्छ केले जाणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.