Chinchwad : पिंपरी चिंचवडच्या साहित्य संवर्धन समितीच्या साहित्यिकांनी वाहिली दिग्गजांना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवडच्या साहित्य संवर्धन समिती (Chinchwad) शहर संस्थेच्या वतीने साहित्यप्रेमी आमदार लक्ष्मण जगताप, प्रेमळ कवी निशिकांत गुमास्ते, आकाशवाणी आणि दूरदर्शनचे वृत्त निवेदक विश्वास मेहेंदळे यांना चिंचवड गाव येथील जिजाऊ पर्यटन केंद्र येथे पिंपरी चिंचवड शहरातील साहित्यिकांनी भावपूर्ण आदरांजली समर्पित केली. 

यावेळी चिंचवड येथील कवी, लेखक अन् विचारवंत नंदकुमार मुरडे म्हणाले, “लक्ष्मणभाऊ सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व होते. कार्यकर्त्यांवर अपार प्रेम त्यांनी केले. बोलणे कमी अन् काम जास्त असा त्यांचा खाक्या असायचा. शहराला नवदिशा देणारी दूरदृष्टी होती त्यांची. त्यामुळेच पिंपरी चिंचवड शहर झपाट्याने विकसित झाले.” याचे श्रेय आमदार लक्ष्मण जगताप यांचेच आहे.

कवयित्री राधाबाई वाघमारे यांनी निशिकांत गुमास्ते यांच्याबद्दल सांगताना म्हंटले, की, “कवी निशिकांत गुमास्ते हे पहाडी आवाजाचे अन् परिवर्तनशील विचारांचे कवी होते. समर्थ रामदासस्वामी यांच्या चाफळ गावचे असल्याने आध्यात्मिक काव्यरचना करीत होते. एक प्रेमळ आणि व्यासंगी कवी आपल्यातून गेले आहेत.”

लेखक अन् निवेदक श्रीकांत चौगुले यांनी विश्वास मेहंदळे यांच्याबद्दल (Chinchwad) सांगितले, की “डॉ. विश्वास मेहेंदळे आकाशवाणी आणि दूरदर्शनचे वृत्तनिवेदक होते. ‘लोकमान्य टिळक यांचे अग्रलेख’ या विषयावर त्यांनी मुंबई विद्यापीठात पीएचडी पदवी प्राप्त केली होती. अनुभव संपन्नतेबरोबर त्यांचे पाठांतर प्रचंड होते. मान आणि धनाचा विचार न करता त्यांनी साहित्यसेवा केली.”

Pune Police : कोयता गॅंग विरोधात पोलिस अॅक्शन मोडवर; थेट दुकानदारालाच अटक

साहित्य संवर्धन समितीचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले “या सर्व उत्तुंग व्यक्तिमत्वांच्या सद्गुणांचा अंगीकार करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे”. या प्रसंगी साहित्य संवर्धन समितीच्या कार्याध्यक्ष शोभा जोशी, सचिव सुहास घुमरे, सविता इंगळे, कवी अनिल दीक्षित, नितीन हिरवे, प्रदीप गांधलीकर, कैलास भैरट, सुप्रिया सोलांकुरे, वर्षा बालगोपाल, संदीप जाधव, डॉ.पी एस आगरवाल, तानाजी एकोंडे, सुभाष चव्हाण, मीना शिंदे, संजय शिंदे, हेमंत जोशी, मुरलीधर दळवी, आत्माराम हारे, शामराव सरकाळे, नंदकुमार कांबळे, फुलवती जगताप, विश्वजीत गुमास्ते, पंजाबराव मोंढे, राजेंद्र भागवत या मान्यवरांनी श्रद्धांजली समर्पित केली. पसायदान म्हणून आदरांजली सभेची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.