Chinchwad News : अभाविपच्या रॅलीतील जीप पायावरून गेल्याने पोलीस जखमी

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने काढलेल्या रॅलीतील एका जीपचे चाक बंदोबस्तावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पायावरून गेले, यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 30) सकाळी चिंचवडगाव येथे घडली. संतोष पंढरीनाथ घंटे (वय 35, रा. पिंपरी पोलीस लाइन, चिंचवड स्टेशन) असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अक्षय राजू खंदारे (वय 25, रा. आदित्य रेसिडन्सी, कासारवाडी) याच्या विरोधात गुम्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडगाव येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने संभाजी शेडगे यांनी तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस नाईक घंटे यांची नियुक्‍ती करण्यात आली होती. सकाळी सव्वादहा वाजताच्या सुमारास रॅलीला सुरवात झाली. गांधीपेठेतून रॅली पावर हाऊस चौक, येथील सन्मती मेडिकल जवळ आली असता रॅलीतील (एम एच 04 / क्‍यू 0796) या जीपचे चाक पोलीस कर्मचारी घंटे यांच्या पायावरून गेले. यात ते जखमी झाले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.