Goa CM Update : पेच सुटला; प्रमोद सावंत होणार गोव्याचे मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज – कोण होणार गोव्याचे मुख्यमंत्री हा पेच निवडणुकीनंतर सुरु होता; मात्र तो आता सुटला असून प्रमोद सावंत हेच गोव्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. याबाबतची घोषणा आज (सोमवारी, दि. 21) करण्यात आली.

पाच राज्यातील निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यातील चार राज्यात भाजपला यश मिळाले. मात्र उत्तर प्रदेश वगळता अन्य तीन राज्यात मुख्यमंत्री कोण होणार, याची घोषणा भाजपकडून करण्यात आली नाही. मुख्यमंत्री पदाचा पेच तीनही राज्यात निर्माण झाला.

प्रमोद सावंत यांनी भाजपसाठी चांगले काम केले आहे. त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्री म्हणून देखील काम केले आहे. गोव्यात भाजपचे 20 आमदार निवडून आले आहेत. त्यातील 17 आमदारांचा त्यांना पाठींबा होता तसेच मुख्यमंत्री पदासाठी विश्वजित राणे हे देखील चर्चेत होते. राणे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी काही जणांनी पुढाकार घेतला. मात्र संख्याबळ प्रमोद सावंत यांच्या बाजूने होते.

याबाबत रविवारी अमित शाह यांच्यासोबत भाजपच्या गोवा आणि अन्य वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर सोमवारी गोवा निवडणुकीचे प्रभारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. त्यानंतर गोव्याच्या मुख्यमंत्री पदासाठी प्रमोद सावंत यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

भाजपनेते गोव्याच्या राज्यपालांना भेटणार असून पुढच्या काही दिवसात शपथविधीची वेळ ठरवली जाणार आहे. प्रमोद सावंत दुस-यांदा मुख्यमंत्री होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.