Pune News : गुंठेवारीमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची कार्यप्रणाली जाहीर

एमपीसी न्यूज – गुंठेवारीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया महापालिकेकडून 10 जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. यासाठी प्रति चौरसमीटर क्षेत्रासाठी पाच रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने नियमितीकरणाची कार्यप्रणाली जाहीर केली आहे.

गुंठेवारीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. आदेशानुसार 31 डिसेंबर 2020 पूर्वीची अनधिकृत घरे आणि इमारतींचे मालक 10 जानेवारीपासून महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे ऑनलाइन पद्धतीने आर्किटेक्ट अथवा लायसन्स इंजिनिअरमार्फत प्रस्ताव दाखल करू शकतील.

हे प्रस्ताव दाखल केल्यानंतर महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील शहर अभियंता कार्यालयाच्या आवक-जावक अर्थात सिंगल विंडोमधून प्रस्ताव तपासून चलन घ्यायचे आहे. चलनाच्या रकमेचा भरणा महापालिकेच्या तळमजल्यावर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये किंवा ऑनलाइन पद्धतीने केल्यानंतर भरणा केलेले चलन व गुंठेवारीची संपूर्ण फाईल व कागदपत्रे बांधकाम विभागाच्या आवक-जावक विभागाकडे जमा करायची आहेत.

आवक-जावक विभागात प्राप्त झालेली गुंठेवारी प्रकरणांची पेठनिहाय यादी करून ती संबधित झोनमध्ये कार्यरत असलेल्या बांधकाम निरीक्षकांकडे हस्तांतरित केली जाणार आहेत. बांधकाम विभागाने सातही झोनमधील गुंठेवारीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी बांधकाम निरीक्षक, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांची जबाबदारी निश्चित केली आहे. या संदर्भातील लेखी आदेशच बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी काढले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.