Pimpri: आगामी अंदाजपत्रकात 407 कोटींची तरतूद करा; पीएमपी प्रशासनाचे महापालिकेला पत्र

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी 2019-20 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात एकूण 407 कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी पीएमपीएमएल प्रशासनाने केली आहे. महापालिका आयुक्त तथा पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना या मागणीचे लेखी पत्र दिले आहे. विद्यार्थ्यांना मोफत बसपास, विविध घटकांना दिले जाणारे सवलतीचे बसपास, बस खरेदी आणि संचलन तुटीचा खर्च या पत्रात नमुद केला आहे. संचलन सुरळीत सुरू राहण्यासाठी दरमहा 4 कोटी 18 लाख रुपये निधी उपलब्ध करुन देण्याची मागणीही या पत्रात केली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारितील अनुक्रमे पीएमटी आणि पीसीएमटी या दोन्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे 2007 साली एकत्रीकरण करून, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीमध्ये पुणे महापालिकेचा 60 टक्के तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 40 टक्के स्वामित्व हक्क आहेत. ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फायद्यात आणण्यासाठी केलेले आतापर्यंतचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. त्यानुसार ही वाहतूक कंपनी सुरू ठेवण्यासाठी या कंपनीला दोन्ही महापालिकांच्या आर्थिक मदतीवरच आजपर्यंत अवलंबून रहावे लागत आहे.

संचलन तुट, पास, बस खरेदी यासाठी आगामी अंदाजपत्रकात पीएमपीएलसाठी 407 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी. याबाबतचे लेखी पत्र पीएमपीएमएलने महापालिका प्रशासनाला दिले असून या पत्रामध्ये गतवर्षीच्या आर्थिक तरतुदींचादेखील संदर्भ देण्यात आला आहे. हा खर्च सादर करताना पीएमपीएमएल प्रशासनाने सद्यस्थिती मांडली आहे. त्यामध्ये एमएनजीलला सीएनजी गॅस पुरवठ्यासाठी 26 कोटी रुपये, सेवानिवृत्त सेवकांची तोषदान 20 कोटी रुपये व तोषदान फरक 21 कोटी अशी एकूण 67 कोटींची देणी प्रलंबित आहेत. सेवकांचे पगार, इंधन व देखभाल दुरुस्तीवरळ खर्चात सात्त्याने वाढ होत असल्याने, दैनंदिन खर्च भागविणे अडचणीचे झाले आहे. सन 2019-20 मध्ये सन-2018-19 मधील एकूण 244.55 कोटी संचलन तुटीपोटी पिंपरी- चिंचवड महापालिकेने 97 कोटी 82 लाख निधी उपलब्ध करुन दिला, तरीदेखील दैनंदिन खर्चास निधी कमी पडणार असल्याचे नमुद केले आहे.

अंदापजत्रकातील रक्कमची केलेली मागणी पुढील प्रमाणे आहे,

पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत पास माध्यमिक विभागाकडील लेखाशिर्ष तीन 37 लाख, नागरवस्ती विकास योजना- अंध/अपंग पासेस अंदाजपत्रक क्र.2 मधील अ. क्र.2 (9)चार कोटी 77 लाख, विविध सवलतीचे पास 17. पीएमपीएमएल निधी 18 कोटी, संचलन तूट (शासन निर्णयानुसार) 17. पीएमपीएमएल निधी 97 कोटी 82 लाख, नवीन 400 बस खरेदी (40 टक्के स्वामित्व हक्कानुसार)17 कोटी 60 लाख, ई- बस सबसिडी 150 बस ( 40 टक्के स्वामित्व हक्कानुसार)30 कोटी,  ई- बस सबसिडी 350 बस ( 40 टक्के स्वामित्व हक्कानुसार)70 कोटी, ई- बस सबसिडी 300 बस ( 40 टक्के स्वामित्व हक्कानुसार) 60 कोटी, बीआरटीअंतर्गत आयटीएमएस सॉफ्टवेअर, हॉर्डवेअर – डेपो विकसन,  निगडी डेपो-सेंट्रल वर्कशॉप मूलभूत सुविधा तीन कोटी, भोसरी डेपो- मूलभूत सुविधा तीन कोटी, डूडूळगाव, च-होली नवे बस डेपो विकसन नऊ कोटी, 135 स्टेनलेस स्टील बस शेड उभारणे चार कोटी, रावेत, वाकड, भोसरी, मोशी येथील जागा संपादित करणे 23 कोटी,  वाढीव उत्पादनांवरील खर्च आठ कोटी 69 लाख आणि संचलन सुरळीत राहण्यासाठी ( 40 टक्के स्वामित्व हक्कानुसार) 50 कोटी 10 लाख

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.