Chikhali: संतपीठासाठी महापालिका कंपनीची स्थापना करणार

आयुक्त असणार पदसिद्ध अध्यक्ष 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे उभारण्यात येत असलेल्या ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ आणि त्या अनुषंगाने शाळा व्यवस्थापनासाठी कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर कंपनीची स्थापना केली जाणार असून आयुक्त श्रावण हर्डीकर पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव विधी समितीमार्फत महासभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. कंपनीचे सेक्रेटरी  सतीश लुंकड हे कंपनी नोंदणीकृत करणे व त्या अनुषंगिक कामकामज पाहणार आहेत.

संतपीठाच्या समितीचे सदस्य निवडण्यासाठी आज ( गुरुवारी)आयुक्त दालनात बैठक पार पडली. महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, शहर अभियंता अंबादास चव्हाण, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, कंपनी सेक्रेटरी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत कंपनी स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला.

भागवत धर्माचा प्रसार व प्रचार व्हावा अन् वारकरी सांप्रदायाचे पारंपारीक शिक्षण जनमाणसांना मिळावे, या उद्देशाने हे ‘संतपीठ’ उभारण्यात येत आहे. टाळगाव चिखलीला सांप्रदायिक वारसा असून शेजारीच श्री क्षेत्र आळंदी, देहू या तिर्थक्षेत्रांचे सानिध्यही लाभले आहे. त्यामुळे टाळगाव चिखली येथे राज्यातील पहिले ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ उभारण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे घेण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक एकमध्ये उभारण्यात येणा-या या संतपीठ उभारणीला 13 मे 2015  रोजी महापालिका सभेत मान्यता देण्यात आली.

त्यानंतर माध्यमिक शाळेसाठी आरक्षित चिखली येथील 1 हेक्टर 80 गुंठे जागा महापालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. या संतपीठामध्ये निवासी स्वरुपाचे, प्राथमिक शाळेपासून ते उच्चपदवीपर्यंतचे केवळ संतसाहित्यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. येथे वसतीगृह, सभागृह, अभ्यासवर्ग आदींचा समावेश असणार आहे. येथील शाळेमध्ये सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना प्रवेश असून हे संतपीठ मराठी माध्यमातून शिक्षण देणारे असणार आहे. महापालिकेतर्फे उभारण्यात येणारे हे संतपीठ आणि त्याअनुषंगाने शाळा व्यवस्थापनासाठी कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संतपीठाच्या कामासाठी येणा-या 45 कोटीच्या खर्चाला स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे.

‘हे’ असणार समितीचे सदस्य!

आयुक्त श्रावण हर्डीकर पदसिद्ध अध्यक्ष
मुख्यलेखापाल जितेंद्र कोळंबे – संचालक
प्राथमिक शिक्षणाधिकारी पराग मुंढे – संचालक
शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे – सदस्य
संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे – सदस्य
माजी अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे – सदस्य
राजु ढोरे महाराज – सदस्य
स्वाती मुळे  – सदस्य
कायदा सल्लागार हे देखील सदस्य असणार आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.