Vadgaon News : वडगाव-पैसाफंड साखळी रस्त्याच्या रुंदी व डांबरीकरणासाठी निधी द्या

नगरसेविका सायली म्हाळसकर यांची आमदार शेळके यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – मागील काही वर्षांपासून औद्योगीक व वाढत्या शहरीकरणामुळे वडगाव नगरपंचायत हद्दीतील वडगाव-पैसाफंड काचकारखाना साखळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. वाहतूक व रोजच्या दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता सद्याच्या परिस्थितीत अपुरा व अरुंद पडू लागला असून रस्त्याची त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या रस्त्याचे रुंदी व डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी मनसे नगरसेविका सायली रुपेश म्हाळसकर यांनी बुधवारी (दि. 13) मावळचे आमदार सुनील शेळके यांची भेट घेत याबाबतचे निवेदन दिले. या रस्त्याच्या कामासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार शेळके यांनी दिले.

मावळ व इतर तालुक्यातील नागरीक, प्रवासी, विद्यार्थी, कामगार, शेतकरी सुरक्षित व सोईस्कर मार्ग म्हणून या रस्त्याचा वापर करतात. ऐतिहासिक नोंद असलेल्या या साखळी रस्त्यावर आजही पूर्वीच्या काळातील पाऊलखुणा व वाटा आढळून येतात. पैसाफंड काचकारखाना, ईगल फ्लॅस्क, नवीन समर्थ विद्यालय, तळेगाव जनरल हॉस्पिटल व चाकण रस्ता या ठिकाणी जाण्यासाठी प्रामुख्याने या रस्त्याचा वापर केला जात.

याच पाऊलखुणा व वाटा अधिक ठळक व मजबूत करण्यासाठी तसेच नियोजित रिंगरोड व झपाट्याने वाढत चाललेल्या नागरीकरणाचा विचार लक्षात घेता आगामी काळात या रस्त्याला मोठे महत्व प्राप्त होणार आहे. पुढील काही वर्षांची गरज ओळखून व दूरदृष्टि ठेऊन शहराचे अर्थकारण आणि विकास साधण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करणे गरजेचे आहे.

रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करत असताना प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 16 मधून म्हणजेच खंडोबा मंदिर ते एमआयडीसी रोड पर्यंत जाणाऱ्या रस्त्याबाबत विकासात्मक धोरण ठेऊन व त्याची आखणी करुन कायम स्वरूपी पद्धतीने विकासकामे करण्यात यावी  व त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन द्यावा, असे म्हाळसकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

वडगाव-पैसाफंड साखळी रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करताना रस्त्याच्या बाजूस असणाऱ्या वीज वाहक तारा (केबल) भूमिगत करणे. रस्त्याच्या मधोमध मोठ्या आकाराची सांडपाणी व्यवस्था करणे. रस्त्याच्या एका बाजूने पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी टाकणे. प्रस्तावित डी. पी. आराखड्यानुसार 18 मीटर असणारा रस्ता कमीत कमी 12 मीटर करण्यात यावा. रस्त्याच्या एका बाजूस फूटपाथ व दुसऱ्या बाजूस झाडे लावून सुशोभीकरण करण्यात यावे. रस्त्याच्या ठराविक अंतरावर स्वछतागृह (ई-टॉयलेट), बसथांबा (निवाराशेड व बाकडे ) असावेत. रस्त्याच्या एका बाजूस आधुनिक पथदिवे व सीसीटीव्ही बसविण्यात यावेत. रस्त्याच्या सुरुवातीस  दोन्ही बाजूला प्रवेशद्वार उभारण्यात यावे. या सर्व बाबींचा विचार केल्यास वडगाव शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडेल व विकासाचे मॉडेल म्हणून वडगाव शहर उदयास येईल असेही निवेदनात म्हटले आहे.

याबाबत बोलताना आमदार सुनील शेळके यांनी या रस्त्याच्या कामास जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.