Pune : पुल स्मृती सन्मान उस्ताद झाकीर हुसैन यांना जाहीर

डॉ. जयंत नारळीकर आणि शि. द. फडणीस यांना विशेष सन्मान

एमपीसी न्यूज – पुलंच्या जन्मशताब्दी निमित्त दिला जाणारा पुल स्मृती सन्मान उस्ताद झाकीर हुसैन यांना तर जीवनगौरव सन्मान पं. हृदयनाथ मंगेशकर यांना जाहीर करण्यात आला आहे.  पुण्यात गेली 14 वर्षे संपन्न होणारा पुलोत्सव यावर्षी  पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अधिक  दिमाखदार स्वरूपात आयोजित करण्यात आला असून  येत्या 17 ते 25 नोव्हेंबर दरम्यान बहुरंगी कार्यक्रमांच्या माध्यमातून रसिकांना पुलोत्सवाची पर्वणी अनुभवता येणार आहे.

वीरेंद्र चित्राव यांनी आज पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पुलोत्सवा विषयी माहिती दिली.

पु.ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘पु.ल परिवार’ आणि ‘आशय सांस्कृतिक’ च्या वतीने आयोजित यंदाच्या पुलोत्सवात या संगीत, कला, साहित्य क्षेत्रातील दिग्गजांचा गौरव केला जाणार आहे. पुलोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यात पं. हदयनाथ मंगेशकर यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

गुरूवार दि. 22 नोव्हेंबर रोजी डॉ. जयंत नारळीकर यांचा विशेष सन्मान ज्येष्ठ साहित्यिक द.मा मिरासदार यांच्या हस्ते होणार आहे तर शुक्रवार दि. 23 नोव्हेंबर रोजी शि.द फडणीस यांना ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते गौरविले जाणार आहे. पुलोत्सवाच्या समारोपात ज्येष्ठ तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते ‘पु.लं स्मृती सन्मान’ प्रदान केला जाणार आहे. यावेळी झाकीर हुसेन यांच्याशी डॉ. पटेल संवाद साधणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.