Pune : गीता सार जगापुढे मांडण्यात भारतीय अभ्यासक कमी पडले: न्या बी एन श्रीकृष्ण

भगवद्गीतेवरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे पुण्यात उद्घाटन

एमपीसी न्यूज – “भारतातील फक्त श्रीकृष्णाला जगद्गुरू समजण्याचा मान आहे. श्रीकृष्णाने जीवन कर्तव्याबद्दल भगवतगीतेत मार्गदर्शन केले आहे.पण, भारतातील अभ्यासक भगवद़ गीतेतील ज्ञानाचा अभ्यास करून गीता सार जगापुढे मांडण्यात कमी पडले, ” अशी खंत न्या.बी.एन. श्रीकृष्ण यांनी व्यक्त केली. इंटरनॅशनल गीता फाऊंडेशन ट्रस्ट, अवधूत दत्त पीठम् (म्हैसूर) आणि भारतीय विद्या भवन ( पुणे ) या संस्थांच्या वतीने पुण्यात आयोजित 17 व्या दोन दिवसीय ‘ ग्लोबल गीता कॉन्फरन्स ‘ या भगवद्गीतेवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आज, शनिवारी न्या. बी. एन. श्रीकृष्ण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी न्या. श्रीकृष्ण बोलत होते.

या कार्यक्रमाला न्या. बी एन श्रीकृष्ण, स्वामी जपानंद महाराज, सिद्धेशनांद महाराज (चिन्मय मिशन) यांच्यासमवेत संयोजक डॉ. पी .व्ही. नाथ, सी.एन. गुप्ता, नंदकुमार काकिर्डे, गीता धर्म मंडळाचे मुकुंद कोंडवेकर उपस्थित होते.

न्या. श्रीकृष्ण म्हणाले, ” गीतेचा संदेश दैनंदिन जीवनात आचरणात आणण्यात आपण कमी पडत आहोत. गीतेतून आपल्याला सर्व पुरुषार्थ सांगीतले आहेत. त्याचे काळजीपूर्वक मनन केले पाहिजे. अनेक आक्रमणे होऊन, शतके लोटूनही भगवदगीतेवरील जनमानसाची श्रध्दा कमी झाली नाही. भारतातील फक्त श्रीकृष्णाला जगद्गुरू समजण्याचा मान आहे. श्रीकृष्णाने जीवन कर्तव्याबद्दल भग्वद्ग गीतेत मार्गदर्शन केले आहे.पण, भारतातील अभ्यासक भगवद़ गीतेतील ज्ञानाचा अभ्यास करून गीता सार जगापुढे मांडण्यात कमी पडले. भगवदगीतेतील संदेशांचा अभ्यास केला पाहिजे. या संदर्भात जागतिक परिषदा भरवण्याचे इंटरनॅशनल गीता फाऊंडेशनचे कार्य महत्वपूर्ण आहे” असेही त्यांनी सांगितले.

19 आणि 20 ऑक्टोबर रोजी ही परिषद भारतीय विद्या भवन येथे होत आहे. प्रामुख्याने 17 व्या अध्यायातील श्लोकांचे विवेचन या परिषदेत होत आहे. या धीच्या परिषदा अमेरिका, इंग्लंड, भारतात झाल्या होत्या. देशातून, देशाबाहेरील एकूण 12 वक्ते परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.

उद्घाटन कार्यक्रमात भारतीय विद्या भवनच्या विद्यार्थांनी गीतेतील श्लोकांचे सामूहिक पठण केले. विप्लव गांगुली यांनी सूत्रसंचालन केले. राजकुमार गुप्ता यांनी आभार मानले. देशातून आणि परदेशातून भगवद्गीतेचे अभ्यासक या परिषदेत सहभागी झाले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.