Pune : हडसर किल्ल्याचा पश्चिम कातळकडा ‘गिरिप्रेमीं’कडून सर

26 जानेवारीला ‘गिरिप्रेमी’च्या टीमने 365 फुटांचा कडा सर करून त्याचे ‘हडसर रिपब्लिक’ असे नामकरण केले 
 
एमपीसी न्यूज – अग्रगण्य गिर्यारोहण संस्था ‘गिरिप्रेमी’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 26 व 27 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘गिरिप्रेमी’च्या टीमने हडसर किल्ल्याच्या पश्चिमेकडील कातळकडा प्रस्तरारोहण करून सर केला. 26 जानेवारीच्या मुहूर्तावर हा कडा प्रथम सर केल्यामुळे याचे नामकरण ‘हडसर रिपब्लिक’ असे करण्यात आले आहे. 
 
365 फुटांचा हा कातळकडा चढाईच्या दृष्टीने कठीण श्रेणीत मोडणारा कडा आहे. ‘गिरिप्रेमी’च्या टीमने पारंपरिक प्रस्तरारोहण पद्धतीचा वापर करून यावर चढाई केली. यात ‘गिरिप्रेमी’चा प्रस्तरारोहक डॉ. सुमित मांदळे याने कड्याच्या पायथ्यापासून शिखरापर्यंतचा पूर्ण रूट ओपन केला, त्याला पवन हडोळे व अक्षय पत्के यांनी सुरक्षा रोप पुरवण्याचे काम केले. गिरिप्रेमीच्या गिर्यारोहकांनी आतापर्यंत सिंहगडचा खांदकडा, कातराकडा, ढाकोबा, नाफ्ता, आर्थर सीट, तसेच जीवधन किल्ल्याजवळील शिवगिरी या कड्यांवर प्रथम आरोहण करण्याची कामगिरी केली आहे. त्यामध्ये आता हडसर कातळकड्याचा नव्याने समावेश झाला आहे. 

 
या कातळकड्यावर चढाई करताना 3 टप्पे बनविले गेले. यात पहिला टप्पा 35 फुटांवर, दुसरा टप्पा 135 फुटांवर, तिसरा टप्पा 250 फुटांवर बनविण्यात आला. यात चौथा टप्पा हा थेट कातळकड्याचा शिखरमाथा होता. यातील तिसऱ्या टप्प्यानंतरची 115 फुटांची चढाई विशेष आव्हानात्मक होती, कारण ही संपूर्ण चढाई 90 अंशांतील खड्या दगडी भिंतीवर करायची होती. डॉ. मांदळे यांनी आपल्या प्रस्तरारोहणातील कौशल्येपणाला लावून यावर चढाई करत रूट ओपन केला. इतर सदस्यांनी देखील आपल्या प्रस्तरारोहण शैलींचे उत्तम प्रदर्शन केले. हा संपूर्ण कातळकडा हडसर किल्ल्याच्या पायरी मार्गाच्या अगदी जवळ आहे व पावसाळी दिवसात वाहणाऱ्या धबधब्याला मार्गाला लागून आहे. 
 
‘गिरिप्रेमी’चा एव्हरेस्टवीर गणेश मोरे व निष्णात प्रस्तरारोहक समीरण कोल्हे या दोघांच्या नेतृत्वाखाली हडसर कातळकड्यावरील मोहीम आखण्यात आली होती. यात डॉ. सुमित मांदळे, एव्हरेस्टवीर आशिष माने, एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले, अक्षय पत्के, जितेंद्र गवारे, जयंत वाकोडे, प्रियंका चिंचोरकर, संकेत धोत्रे, पवन हडोळे व आदित्य सेलूकर यांनी सहभाग घेतला.या मोहिमेस ज्येष्ठ गिर्यारोहक व श्री शिव छत्रपती पुरस्कार विजेते उमेश झिरपे यांचे मार्गदर्शन लाभले.

"Jahirat"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.