Chinchwad : मिसळीची चव चाखा चिंचवडलाच

एमपीसी न्यूज – गरिबातील गरिबापासून ते गर्भश्रीमंतापर्यंत प्रत्येकाला चटकदार आणि झणझणीत मिसळ आवडते. गावातील असो किंवा शहरातील माणूस, त्याने मिसळीची चव चाखली नाही, असे शक्य नाही. मिसळीला स्वत:चा असा स्वाद आणि रंग आहे. इतकेच काय तर मिसळपावाच्या भोवती अनेकांच्या आठवणी जोडलेल्या असतात. 

आपण मिसळीचे चाहते असाल तर सकाळी सकाळी मिसळवाला फोडणी देत असताना तिथे हजर राहायला हवे. सूर्याची किरणे वरवर चढत असताना ज्याप्रमाणे निरेची ताडी होते. तशी मिसळीची उसळ तयार होते. नाक झणझणाणून टाकणा-या फोडणीच्या वासासारखा दुसरा आनंद नाही. वाटाणे, मोड आलेली मटकी किंवा मुगाची झणझणीत उसळ… त्यावर लाल तिखट तेलाची तर्री… फरसाण आणि त्यावर भूरभूरलेला बारीक कांदा, कोथिंबीर सोबत लज्जत वाढवायला लिंबू आहेच… मिसळ हा असा खाद्यप्रकार आहे. जो सकाळी सकाळीच खाण्यात खूप मजा असते. आजही कोणत्याही गावात गेलात तर आपल्याला त्या ठिकाणी मिसळ मिळते. सकाळ झाली की, आजही बरेच खवय्ये देवाला जावे त्याच भक्तिभावाने प्रसिद्ध मिसळीच्या दुकानात जातात. आता अशी बरीचशी ठिकाणे आहेत. 

अशीच झणझणीत घरचा मसाला वापरुन केलेली मिसळ चाखायची असल्यास चिंचवडगावातील गांधी चौक येथे छोटेखानी विनायक हॉटेलला भेट नक्की द्या. प्रत्येक भागातील मिसळीला स्वतःचा स्वाद आणि रंग असतो. मग ते कोणतेही ठिकाण असो. खमंग अशी मिसळ पावासोबत खाण्याची पद्धत आजही लोकप्रिय आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मिसळीवर ताव मारणा-यांची संख्या मोठी आहे. या मिसळच्या प्लेटची किंमत गरीबाला परवडेल अशी केवळ पन्नास रुपये एवढीच. 

मिसळीबाबत बोलताना शैला हेंद्रे म्हणतात, गेल्या १८ ते १९ वर्षापासून मिसळचा व्यवसाय आहे. येथे येणारा प्रत्येक जण मिसळ बढिया आहे, असे सांगूनच जातात. मिसळसाठी सर्व साहित्य घरगुती पद्धतीने केले जाते. त्यात फरसाण बाहेरुन आणून मग मिसळ तयार करून ग्राहकाला खायला देणे हे आम्हाला जमत नाही. त्यामुळे ग्राहकाला घरच्या मिसळीची टेस्ट आम्ही देतो. पण काही का असेना.. मिसळ हा मराठी माणसाचे चवीनुसार बदलणारे फ्युजन आहे, एवढे मात्र नक्की. 

"Vinayak

"Jahirat"

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.