Pune : समाविष्ट 11 गावांत पाणी देण्यासाठी नगरसेवक गणेश ढोरे, योगेश ससाणे यांचे सभागृहात खाली बसून आंदोलन

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 11 गावांत नागरिकांना चांगल्या दाबाने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश ढोरे, योगेश ससाणे यांनी आज केली. गावकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने पाणीपट्टी आकारण्यात येऊ नये, या मागणीसाठी आज महापालिका सर्वसाधारण सभेत ढोरे आणि ससाणे यांनी भर सभागृहात खाली बसून आंदोलन केले. गावांत पिण्याचे पाणी 8 ते 10 दिवसांतून 1 वेळ येते. 1 ते दीड तासच पाणी मिळते.

या गावांत सद्यस्थितीत होणारा पाणीपुरवठा अत्यंत अपुऱ्या स्वरूपाचा आहे. 40 ते 50 टक्के लोकांना पाणी 15 – 15 दिवस मिळत नाही. या नागरिकांवर बाहेरून पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे. ही गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर विकास होण्याची गावकऱ्यांना आशा होती. पण, गावकऱ्यांना अश्वासनाच्या गाजराशिवाय काहीच मिळाले नाही, असा आरोप गणेश ढोरे यांनी केला.

फुरसुंगी गावात पाण्याची अडचण येत आहे. लष्कर पाणीपुरवठा केंद्रातून पाणी देण्याचा प्रयत्न केला. पण, ते पोहोचले नाही. 11 गावांसाठी सेफरेट प्रोजेक्ट सल्लागार नेमला आहे. त्यासाठी 6 महिने लागणार आहेत, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. त्यावर हरकत घेत मग, नागरिकांवर पाणीपट्टी कशासाठी लादता, असा सवाल मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी उपस्थित केला.

महापालिकेपेक्षा ग्रामपंचायत बरी होती, अशी संतप्त भावना गणेश ढोरे यांनी उपस्थित केला. टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश प्रभारी महापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आज दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.