Pune : बंडखोरांना शांत करण्याचे वरिष्ठ नेत्यांसमोर आव्हान

एकही जागा मिळाली नसल्याने शिवसैनिक आक्रमक

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीत भाजपने शहरातील आठही मतदारसंघांत उमेदवार उभे केले. वारंवार मागणी करूनही शिवसेनेला एकही मतदारसंघ सोडला आला नाही. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे यावेळी एकतरी मतदारसंघ सोडण्याची अपेक्षा होती. अशाप्रकारे भाजपने निर्णय घेतल्याने शिवसेना शहरातून हद्दपार करण्याचा हा डाव असल्याची चर्चा सुरू आहे.

उद्या सोमवारी (दि. 7) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. काँगेस, भाजप, शिवसेना या पक्षातील प्रबळ इच्छुक असलेल्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. पक्ष त्यांची कशी समजूत घालणार याकडे लक्ष लागले आहे. कसबापेठ मतदारसंघातून शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचाराला सुरुवातही केली आहे. त्यामुळे भाजप उमेदवार, महापौर मुक्ता टिळक यांची डोकेदुखी वाढली आहे.

वडगावशेरी मतदारसंघात शिवसेनेचे पुणे महापालिकेतील गटनेते तथा नगरसेवक संजय भोसले यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेला सुटणार असल्याची कुजबुज होती. पण, ती फोल ठरली. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात शिवसेना नगरसेविका पल्लवी जावळे यांनीही बंडखोरी केली आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेस पुरस्कृत नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी माघार घेतली. माजी महापौर कमल व्यवहारे यांनीही बंडखोरी केली आहे. पर्वती मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी बंडखोरी केली आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांना आव्हान दिले आहे. आपल्यावर पक्षातील काही व्यक्ती अन्याय करीत असून, राजकारणातून हद्दपार करण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. खडकवासला मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे या बंडखोरांना शांत करण्याचे आव्हान पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.