Pune : शास्त्रीय नृत्यातून जिवंत झाली ‘ शिव ‘ रुपे !

एमपीसी न्यूज- महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ शिवार्पणम’या शिवस्तुतीपर नृत्य कार्यक्रमाला शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमात भरतनाट्यम, कथक ,कुचिपुडी या भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींमध्ये शिवस्तुतीपर विविध रचना सादर करण्यात आल्या. कार्यक्रमाची संकल्पना अनुजा बाठे यांची होती. शिवांजली डान्स अकॅडमीने हा कार्यक्रम सादर केला. अनुजा बाठे ,साक्षी पासकंठी ,दर्शना पासकंठी ,अनुष्का भंडारी ,मैथली बहिरट, अनुजा चव्हाण, धनश्री पुणतांबेकर, वैष्णवी पुणतांबेकर, राजलक्ष्मी बागडे यानी भरतनाटयम रचना सादर केल्या. चिन्मयी गोडबोले, अतिशा हर्षे कथक रचना आणि गौतमी गोडसे कुचीपुडी रचना सादर केल्या.

या कार्यक्रमात कैलासवासी शंकर नृत्यसभेत नृत्य करताना पाहायला मिळाले, तांडव नृत्यही रोमांचित करुन गेले. उमापती, महादेव, तांडव प्रिय शंभो, नटेश्वर, रुद्र ,तिन्ही लोकांचा पालनकर्ता अशी रुपेही नृत्यातून सादर झाली. ध्यानस्थ, त्रिगुण स्वरूप परब्रह्म शिवमुद्राही रसिकांना अनुभवता आल्या.

शिवतांडव स्तोत्र,शिव स्तोत्र तसेच थाळीनृत्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा हा ७० वा कार्यक्रम होता. श्रुती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.