Pune Bjp agitation : लॉकडाउनच्या विरोधात शहर भाजपचा ‘सविनय कायदेभंग’

एमपीसीन्यूज : लॉकडाउनच्या विरोधात पुणे शहर भाजप आक्रमक झाली असून, आज भाजपच्या व्यापारी आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्त्वाखाली बिबवेवाडी परिसरातील हार्डवेअरचे दुकान उघडून ‘सविनय कायदेभंग’ आंदोलन सुरू केले.

आमदार माधुरी मिसाळ, शहर सरचिटणीस गणेश घोष, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेंद्र व्यास यावेळी उपस्थित होते.

जगदीश  मुळीक म्हणाले, ‘राज्याच्या आदेशापेक्षा पुणे शहरात वेगळा लॉकडाउन लावण्यात आला आहे. हा लॉकडाउन व्यापारी, छोटे व्यावसायिक आणि हातावर पोट असणार्‍या श्रमिकांवर अन्याय करणारा आहे. या लॉकडाउनमुळे पुणे शहराची अर्थव्यवस्था बिकट होणार आहे. तसेच सर्वसामान्यांना रोजची भाकरी मिळणे ही अवघड होणार आहे. त्यामुळे या अन्यायकारक निर्णयाला आम्ही दुकाने उघडून सविनय कायदेभंगाने विरोध करीत आहोत.’

मुळीक पुढे म्हणाले, ‘सरकार पुण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेत आहे. त्यात एकवाक्यता नाही. पुण्यातील सर्वच दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शहराची अर्थव्यवस्था कोलमडणार आहे. नागरिकांची गैरसोय होणार आहे. यातून हप्ते वसुली सुरू होण्याची भीती आहे. ज्याप्रमाणे राज्यात लॉकडाउन आहे, त्याच नियमांवर आधारित शहरात लॉकडाउन सुरू करावे.

सर्वप्रकारच्या दुकानांना परवानगी द्यावी, संचारबंदी रात्री ८ नंतर लागू करावी आणि पीएमपीची बससेवा पूर्ववत सुरू करावी या आमच्या मागण्या आहेत. त्या शासनाने तातडीने मान्य कराव्यात. राज्य सरकारच्या अन्याय मागण्यांच्या विरोधात भाजप व्यापार्‍यांच्या बरोबर आहे.’

आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, ‘राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’चा आदेश काढला. परंतु त्यातून पुण्याला वगळले आणि अधिक कठोर निर्बंध लावले. एकप्रकारे हा संपूर्ण लॉकडाउनच आहे. गेल्या लॉकडाउनमध्ये व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता कुठे ते या परिस्थितीतून बाहेर येत होते. तर नवीन नियमांमुळे त्यांच्यावर आणि त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या कर्मचार्‍यांचे मोठे हाल होणार आहेत. शहरात राज्याप्रमाणे नियमावली जाहीर करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.