Pune News: वैफल्यग्रस्त नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी

एमपीसी न्यूज – नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघडकीस येत असल्याने ते वैफल्यग्रस्त अवस्थेत पुरावा नसलेले बिनबुडाचे आरोप करीत आहेत. दररोज उठून आरोप करायचे आणि नंतर सारवासारव करायची या मलिकांच्या नौटंकीला जनता कंटाळली आहे. मंत्री म्हणून त्यांना काहीच काम राहिलेले नाही. त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे उघड झाल्याने मलिक यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.

मुळीक पुढे म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री म्हणून मोठी कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रात प्रगती झाली आहे. सवंग लोकप्रियतेसाठी अशा नेत्यावर चिखलफेक करण्याचे काम मलिक करीत आहेत. महाराष्ट्रातील जनतेने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जनाधार दिला होता. अशा नेत्यावर टीका करण्याची मलिक यांची योग्यता नाही.

भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने आज कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासमोर नवाब मलिक यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. त्यावेळी मुळीक बोलत होते.

मुळीक म्हणाले, ‘मलिकांच्या जावयाला अंमली पदार्थाच्या व्यवहारात अटक करण्यात आली. त्याला निर्दोष सिद्ध करण्याच्या नादात सूडाच्या भावनेने सरकारी अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे चारित्र्यहनन करीत आहेत. मात्र या नादात ते स्वतः अडकले असून त्यांचे अंडरवर्ल्ड बरोबरचे संबंध उघडकीस आले आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही. त्यांनी तातडीने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा तीव्र जन आंदोलन केले जाईल.’

बाप्पू मानकर म्हणाले, मलीक यांनी नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. जावयाच्या प्रेमात ते आंधळे झाले आहेत. त्यांची विधाने वैयक्तिक द्वेषातून आणि जाती, धर्मांमध्ये भांडणे लावणारी आहेत. महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही.

या आंदोलनाला मुळीक यांच्या सह युवा मोर्चा चे शहराध्यक्ष राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर, अमृत मारणे, प्रतीक देसरडा, दीपक पवार सुनील मिश्रा राजू परदेशी, अक्षय वयाळ अभिजित राऊत, निवेदिता एकबोटे, दुष्यंत मोहोळ, अपूर्व खाडे, अमित कंक, निखिल शिळीमकर, आशिष सुर्वे, अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.