Pune Corona Warier : कोरोनाची लढाई जिंकणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे वरिष्ठांनी पुष्पवृष्टीने केले स्वागत

Pune Corona Warier: Seniors welcome the police personnel with a shower of flowers who win the battle against corona

एमपीसी न्यूज – तब्बल 25 दिवस चिकाटीने झुंज देत कोरोनाविरुद्धची लढाई जिंकणाऱ्या पोलीस दलातील एका कोरोना योद्ध्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पवृष्टी करीत स्वागत केले.

पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सचिन खुटे यांना 24 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांना लवळे येथील सिम्बॉयोसिस महाविद्यालयात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणी झालेल्या उपचारांमुळे त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. पूर्ण बरे झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. त्यावेळी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आवर्जून उपस्थित होते. या सर्वांनी फुले उधळून सचिन खुटे यांचे स्वागत केले.

पुण्यात आतापर्यंत ;चार हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. पुणे पोलिस दलातील 25 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 13 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 12 कर्मचाऱ्यांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या दिलीप लोंढे या पोलीस कर्मचाऱ्याचा काही दिवसांपूर्वीच उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.

पुणे पोलीस दलातील ज्या कर्मचाऱ्यांचे वय 50 च्या पुढे आहे, आणि ज्या महिला कर्मचाऱ्यांच्या घरात लहान मुलं आहेत अशा कर्मचाऱ्यांना कोरोना बंदोबस्ताची ड्युटी न देण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी या पूर्वीच घेतला आहे. याशिवाय सेवानिवृत्ती जवळ आली आहे किंवा काही आजार आहेत, अशा कर्मचाऱ्यांना अधिकची रजा दिली आहे.

कोरोनासोबत दोन हात करणाऱ्या पोलिसांना प्रोत्साहन म्हणून दहा हजारांचे विशेष पारितोषिक दिले जाणार आहे. हे बक्षीस पोलिस कल्याण निधीतून त्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे. तर आगाऊ रक्कम म्हणून एक लाख रुपये बिनव्याजी संबंधित पोलिसांना दिले जाणार आहेत.

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रातल्या 60 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण 1 हजार 388 पोलीस कोरोनाच्या विळख्यात आहे.  पिंपरीत आज 4 पोलिसांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.