Pune Crime News : रस्त्यावर केक कापल्याप्रकरणी गुंड रुपेश मारणे विरोधात गुन्हा दाखल

एमपीसीन्यूज : जमाबंदी आदेश असतानाही सार्वजनिक रस्त्यावर गर्दी जमवून भररस्त्यात केक कापल्या प्रकरणी गजा मारणे टोळीतील गुंड रुपेश मारणे याच्याविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुपेश मारणेसह त्याच्या सात ते आठ साथीदारांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला. 14 फेब्रुवारीच्या रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, समर्थ पोलीस ठाण्यातील बीट मार्शल सचिन जाधव व बालाजी शिंदे हे रात्र गस्तीवर असताना रास्ता पेठेतील इंग्लिश मीडियम स्कूलजवळ घाबरलेल्या अवस्थेत एक तरुण आला. त्याने गुंड रुपेश मारणे हा साथीदारासोबत रस्त्यावर केक कापत असल्याची माहिती दिली.

त्यानंतर लगेच काही पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता मारणे हा त्याच्या साथीदारासोबत केक कापत असल्याचे दिसून आले. परंतु पोलिसांना पाहून त्याचे सर्व साथीदार पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलागही केला परंतु हे सर्व पळून जाण्यात यशस्वी ठरले.

त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने दिलेल्या माहितीवरून गुंड रुपेश मारणे आणि त्याच्या साथीदारांविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात सार्वजनिक जागेत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून, बेकायदेशीर गर्दी जमवून वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस साजरा केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहे

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.