Pune Crime News : अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आणखी पाच आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – पुण्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. आरोपींनी पुणे रेल्वे स्थानकावरून मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आठ आरोपींना अटक केली होती. तर आणखी पाच आरोपींचा शोध सुरू होता. या पाचही आरोपींना आज अटक करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

14 वर्षीय अल्पवयीन मुलगी 31 ऑगस्टच्या रात्री मित्राला भेटण्यासाठी पुणे रेल्वेस्थानक परिसरात गेली होती. दरम्यान, यावेळी मित्र न आल्याने ती रेल्वे स्थानक परिसरात एकटीच बसली होती. या वेळी काही रिक्षाचालकांनी तिला मदत करण्याचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले होते. आणि त्यानंतर पुढील दोन दिवस शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात तब्बल 13 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता.

बलात्कार दरम्यान पीडित मुलगी मिसिंग झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी दिल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला होता. पाच तारखेला ही मुलगी पोलिसांना सापडली. पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन तिच्याकडे अधिक चौकशी केली असता तिने ही धक्कादायक माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करत आठ आरोपींना अटक केली होती. तर आज आणखी पाच आरोपींना अटक केली आहे.

अटकेत असलेल्या आरोपींमध्ये काही रिक्षाचालक तर दोन रेल्वेतील कर्मचारी असल्याचेही समोर आले आहे. आरोपींनी पीडित मुलीवर रेल्वेच्या कार्यालयात, जंगलात, लॉजवर आणि रिक्षामध्ये सामूहिक अत्याचार केला होता. वानवडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.