Chinchwad News : टेलरहो ! पोलिसांचा गणवेश शिवून देताय, मग हे वाचा…

एमपीसी न्यूज – पोलीस असल्याची बतावणी करून दुकानदारांकडून पैशांची मागणी करणाऱ्या तोतयांना पोलिसांनी सांगवी येथे अटक केली. यापूर्वी कुदळवाडी परिसरात एका तोतया पोलीस अधिका-याला देखील पोलिसांनी अटक केली. या प्रकारानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आपल्या कारवाईचा बडगा आरोपींसोबतच त्यांना गणवेश शिवून देणा-या टेलरकडे वळवला आहे. त्यामुळे पोलिसांचा गणवेश शिवून देणा-या टेलरना आता अधिक सतर्क राहून काम करावे लागणार आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, काही टेलर कुठलीही खातरजमा केल्याशिवाय शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिसांचे गणवेश शिवून देतात. तोतयेगिरी करणाऱ्या व्यक्ती असे पोशाख घालून अनेकांची फसवणूक तसेच अन्य गुन्हे करतात. गणवेश असल्याने नागरिकही त्यांच्या अमिषाला, कारवाईच्या धमकीला बळी पडतात.

सांगवी येथे एका पठ्ठ्याने थेट पोलीस अधिका-याच्या गणवेश घालून एका दुकानदाराला कारवाईची धमकी देत पैसे घेतले. त्याच्यासोबत तोतया बँक मॅनेजर देखील होता. पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या. यापूर्वी एक बहाद्दर आलिशान कारमधून मुंबईचा एसीपी असल्याचे सांगून राज्यभर फिरत होता. चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी त्याला संशयावरून अडवले आणि त्याची उलट तपासणी केली असता तो तोतया असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांच्या खांद्यावरील स्टार, फित आदी टेलर तसेच इतर दुकानांमध्येही सहजच उपलब्ध होतात. यासह पोलिसांची काठी, बूट, कमरेचा पट्टा, टोपी, शिटी, आदी साहित्य देखील कोणतेही ओळखपत्र न दाखवता सहजच खरेदी करता येते. त्यामुळे त्याचा गैरवापर करून काहीजण तोतयेगिरी करीत असल्याचे अनेकदा समोर आले आहे.

शहरात काही नाट्य कलाकार आहेत. तसेच शाळा व महाविद्यालयीन स्तरावर देखील विद्यार्थ्यांकडून नाट्य, नाटिका आदी प्रयोग केले जातात. त्यासाठी ‘ड्रेपरी’ आवश्यक असते. यात पोलिसांच्या गणवेशाचाही समावेश असतो. असा गणवेश तयार करून देणाऱ्या टेलरने संबंधित संस्थेचे पत्र घ्यावे. तसेच त्याबाबत पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागेल.

पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना गणवेश शिवून देताना संबंधितांकडून पोलीस असल्याचे ओळखपत्र तपासून घेणे आवश्यक आहे. तसेच कोणत्या पोलिसाला गणवेश शिवून दिला, याचीही नोंद बंधनकारक केली जाणार आहे. शहरातील टेलरना याबाबत नोटीस देण्यात येणार आहे.

राज्यभरात असे प्रकार थांबविण्यासाठी टेलरना सूचित करण्यात यावे, अशा आशयाच्या मागणीचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर करणार असल्याचेही आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.