Pune Crime News : जयंत राजपूत आत्महत्या प्रकरण : चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत जयंत राजपूत यांनी 28 ऑक्टोबर 2020 रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी याप्रकरणी चार जणांविरुद्ध नव्याने गुन्हा दाखल केला आहे. कर्ज वसुलीसाठी रिकवरी एजंट त्यांना धमकावत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयंत राजपूत हे काँग्रेसच्या माजी नगरसेविका नीता राजपूत यांचे पती होते.

_MPC_DIR_MPU_II

राजेंद्र दत्तात्रेय मारणे (वय 45), डॉक्टर विवेक रसिकराज वायसे (वय 44), बापू सुंदर मोरे (वय 40) आणि बापूराव विनायक पवार (वय 34) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नीता जयंत राजपूत (वय 55) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, जयंत राजपूत यांनी लॉ कॉलेज रस्त्यावरील आयुर्मान नॅचरल हेल्थ केअर च्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

सुसाईड नोटमध्ये दिलेल्या मजकुरानुसार जयंत राजपूत आणि आरोपी यांच्यात पैशाचा व्यवहार होता. यातूनच आरोपी यांनी त्यांच्यावर दबाव टाकून त्रास दिला होता. या त्रासाला कंटाळून आरोपींनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.