Pune crime News- शिवसेना पदाधिकाऱ्याचा खून; तिघांना पोलीस कोठडीत

एमपीसीन्यूज : पुण्यातील कसबा युवा सेनेचे विभाग प्रमुख दीपक मारटकर यांची बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सहा जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली. ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली आहे. पोलीसांनी याप्रकरणी एका तरुणीसह तिघांना अटक केली असून तिघांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

अश्विनी सोपान कांबळे ( वय 25, बुधवार पेठ), महेंद्र मदनलाल सराफ (वय 57) आणि निरंजन सागर महंकाळे (वय 19) अशी पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील फरार साथीदार आणि निरंजन हे गुन्हा उघडण्यापूर्वी गंज पेठत प्रत्यक्ष भेटल्याचे साक्षीदाराने दिलेल्या जबाबावरून स्पष्ट झाले आहे.

पोलीस तपासात व आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली असल्याची माहिती सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी न्यायालयात दिली.

त्यानुसार अटक आरोपीसह सनी कोलते, संदीप उर्फ मंगळ्या कोलते, रोहित ऊर्फ बाळा कांबळे, राहुल उर्फ पांड्या रागिर, लखन उर्फ अण्णा धारागीर आणि रोहित शिरसागर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल आलमखाने यांनी फिर्याद दिली आहे

दीपक मारटकर हे शिवसेनेचे दिवंगत नगरसेवक विजय मारटकर यांचे चिरंजीव होते. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर ते घराबाहेर आले आणि एका मित्रासोबत बसले होते.

यावेळी तीन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर कोयत्याने सपासप 48 वार केले. जखमी अवस्थेत दीपक यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.