Pune Crime News: पुण्यातील वकील आठ दिवसांपासून बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल

ॲड. उमेश मोरे यांनी दोन वर्षांपूर्वी दिलेल्या फिर्यादीनुसार भूमीअभिलेख अभियंता बाळासाहेब वानखेडे यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती. 

एमपीसी न्यूज –  पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टिस करणारे ॲड. उमेश मोरे मागील आठ दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. एका मोठ्या लाच प्रकरणातील ते फिर्यादी होते. शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी प्रशांत मोरे यांनी फिर्याद दिली आहे.

ॲड. उमेश मोरे मागील अनेक वर्षांपासून शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टिस करतात. दोन वर्षांपूर्वी एका मोठ्या लाच प्रकरणाच्या गुन्ह्यातील ते फिर्यादी आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भूमीअभिलेख अभियंता बाळासाहेब वानखेडे यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती.

ॲड. उमेश मोरे धनकवडीत राहतात. 1 ऑक्टोबर रोजी ते नेहमीप्रमाणे न्यायालयात गेले होते. न्यायालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी काही मित्रांनाही ते भेटले. त्यानंतर पत्नीशी फोनवर बोलल्यानंतर घरी येतो, असे त्यांनी सांगितले. परंतु रात्री नऊ वाजल्यानंतर ही ते परत आले नाहीत.त्यामुळे कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती.

तक्रार दिल्यानंतर तीन दिवसानंतर ही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.