Pune Crime News : भाडे ‘गुगल पे’ करण्याच्या आमिषाने महिलेच्या खात्यातून 50 हजार रुपये लंपास
एमपीसी न्यूज – फ्लॅट भाड्याने घ्यायचा असल्याचे भासवून गुगल पे द्वारे भाडे देतो असे सांगून महिलेच्या खात्यातून परस्पर 50 हजार रुपये काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुबोध नंदकुमार लोणकर (वय 24) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे धानोरी परिसरात राहतात. त्यांचा फ्लॅट भाड्याने देण्यासाठी फिर्यादीच्या आई नंदा लोणकर यांनी 99 एकर्स या वेबसाईटवर नोंद केली होती.
अज्ञात व्यक्तीने त्यांना फोन करून फ्लॅट भाड्याने घेण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. तसेच फ्लॅटसाठीचे डिपॉझिट गुगल पे करतो असे सांगून फिर्यादी ना सुरुवातीला स्वतःच्या गुगल पे अकाउंट वर एक रुपया ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यातून 25 हजार रुपयांचे दोन ट्रांजेक्शन करत परस्परांच्या 50 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली.
विश्रांतवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.