Pune Crime : दिवाळीत घरफोड्यांचे प्रमाण वाढले, वेगवेगळ्या ठिकाणी चार घरफोडीच्या घटना

एमपीसी न्यूज – दिवाळीच्या दरम्यान पुण्यात घरफोड्यांचे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसून आले आहे. 15 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत शहरातील वारजे, धायरी, मार्केट यार्ड व विश्रांतवाडी या परिसरात चार घरफोडीच्या घटनांची नोंद झाली आहे. रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने यात प्रामुख्याने लंपास केले आहेत.

वारजे येथील घरफोडीत रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख रुपये किंमतीची घरफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विष्णु पाटील (वय 43, रा. वारजे) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याचप्रमाणे धायरी परिसरात 70 हजार रुपयांची घरफोडीची घटना घडली असून केशव रायकर (वय 65, रा. धायरी) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये 50 हजार रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत.

मार्केटयार्ड मधील घरफोडी प्रकरणी रमेश कांबळे (वय 62, रा. मार्केटयार्ड ) यांनी फिर्याद दिली असून, त्यांच्या येथे 1 लाख 45 हजार किंमतीची घरफोडी घडली आहे. 2 लाख 60 हजार रुपयांची घरफोडी विश्रांतवाडी परिसरात घडली आहे. यामध्ये एक लाख रुपयांची रोकड तर, इतर सोन्या चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. 51 वर्षीय महिलेनं याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दिवाळीनिमित्त बरेच लोक गावाला निघून गेले असताना शहरात घरफोडीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. काही ठिकाणी लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेली रोकड देखील पळवून नेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.