Pune : मुंबईहून पुण्याला निघालेली डेक्कन क्वीन 21 तासानंतरही अर्ध्यातच; प्रवाशांचा जीव टांगणीला

एमपीसी न्यूज – मुंबईहून पुण्याला निघालेली डेक्कन क्वीन तब्बल 21 तासानंतरही पुणे स्थानकात पोहोचली नाही. ही रेल्वेगाडी कल्याणमार्गे मनमाडकडे वळवण्यात आली आहे. मध्येच या गाडीतील प्रवाशांना सिंहगड एक्सप्रेसमध्ये बसविण्यात आले आहे. तास-तासभर एकाच स्थानकावर उभारलेल्या गाडीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.

मुंबई, पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा फटका रेल्वे प्रवाशांना चांगलाच बसला आहे. शनिवारी (दि. 3) रात्री मंकी हिल आणि ठाकूरवाडीदरम्यान दोन्ही मार्गावर दरड कोसळली. यामुळे दुपारी सव्वापाच वाजता निघणारी डेक्कन क्वीन रात्री साडेनऊ वाजता सुटली. उशिरा सुटलेली डेक्कन क्वीन कल्याण, मनमाड मार्गे वळवण्यात आली.

  • तब्बल 21 तास उलटल्यानंतर देखील रेल्वे पुणे स्थानकात पोहोचली नाही. ही गाडी मनमाडवरून नाशिककडे वळवण्यात आली असून मध्येच प्रवाशांना बसमधून पाठवणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे प्रवासी चांगलेच मेटाकुटीला आले आहेत.

मुंबईहून पुण्याला जाणारी डेक्कन क्वीन काल संध्याकाळी सव्वा पाच ऐवजी रात्री सव्वा नऊ वाजता सीएसटी वरुन निघाली. ही ट्रेन कर्जत – खोपोलीच्या जवळ आली असता थांबवण्यात आली. पुढं घाटामध्ये दरड कोसळल्याने ट्रेनचा मार्ग बदलण्यात येत असल्याचं प्रवाशांना सांगण्यात आलं. त्यानंतर ही ट्रेन कल्याणला नेण्यात आली आणि तिथं प्रवाशांना डेक्कन क्वीनमधून उतरवून सिंहगड एक्सप्रेसमधे बसवण्यात आलं.

  • ही सिंहगड एक्सप्रेस कसारा घाटातून पुण्याला जाईल, असे प्रवाशांना सांगण्यात आलं. रात्री तीन वाजता ही ट्रेन कल्याणहून निघाली. मात्र, ही ट्रेन कसारा घाटाच्या खाली उंबरमाळी गावाजवळ थांबवण्यात आली. पुढं दरड कोसळल्याने ट्रेन थांबवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. तेव्हापासून ही ट्रेन आणि ट्रेनमधले प्रवासी अडकून पडले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.