Pune : महासंस्कृती महोत्सवात मिळणार नाटक, कला आणि गीत-संगीताची पर्वणी

एमपीसी न्यूज – सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या (Pune) वतीने 28 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत पुणे येथील अण्णा भाऊ साठे सांस्कृतीक सभागृह बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे गदिमा सभागृह आणि सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक सभागृह येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून बुधवार 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृहात महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. महासंस्कृती महोत्सवात नाटक, गीत, संगीत, एकांकीका, लोककला, कीर्तन, भारूड, चित्रकला, हस्तकला अशी भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी कला व नाट्यप्रेमींना मिळणार आहे.

उदघाटन सभारंभात ढोल ताशा पथक, गणेश वंदना व वारसा संस्कृतीचा असे कार्यक्रम सादर करण्यात येतील. बारामती येथील गदिमा सभागृहात सकाळी 10.30 वा. गरजा नाट्य छटांचा, दुपारी 12 वा. क्लाऊन माईम ॲक्ट, रात्री 7 ते 9 या वेळेत पुरूषोत्तम महाराज पाटील यांचे किर्तन तर सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक सभागृहात सायं. 7 ते 10 यावेळेत ‘तुमच्यासाठी कायपण’ या लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

याव्यतिरिक्त साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येरवडा येथे कलामहोत्सव भरणार आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज सचित्र दालन व अज्ञापत्रांच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून शिवकालीन इतिहासातील प्रसंग आणि महाराजांचे कार्य जाणून घेता येईल. विविध शस्त्रास्त्र, गड किल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनही इतिहासप्रेमींसाठी विशेष आकर्षण आहे.

Talegaon Dabhade : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

महोत्सवात पारंपरिक वस्त्रे, खाद्यसंस्कृती, कलाकुसरीच्या वस्तू , राज्यातील प्रेक्षणीय (Pune) स्थळांविषयी जाणून घेता येईल. याशिवाय मर्दानी खेळ, शिवकालीन लोककला, लुप्त होत चाललेल्या खेळासंबंधीचे उपक्रमही शेवटच्या दिवशी जंगली महाराज रस्ता येथे सादर करण्यात येणार आहे.

बचत गटांनी बनविलेल्या अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांची चवही महोत्सवात चाखता येणार आहे. याशिवाय विविध प्रकारचे मसाले, बचत गटांनी तयार केलेले दागिने, पौष्टीक तृणधान्याचे पदार्थ, थालीपीठ, सांडगे, शेवई, उत्तम प्रतिचे तांदूळही स्टॉल्सवर असतील. खवय्यांना पुरणपोळी, बिर्याणी, दाबेली आणि झुणका भाकरची चवही चाखता येणार आहे.

स्थानिक कलाकारांना उत्तेजन व व्यासपीठ मिळवून देणे, लुप्त होणाऱ्या कलांना व गुणांना व्यासपीठ मिळवून देणे, असंघटित क्षेत्रातील कलाकारांना सादरीकरणासाठी संधी देणे, नागरिकांना राज्याच्या कला व संस्कृतीची ओळख करून देणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. 5 दिवसांच्या या महोत्सवात नाटक, गीत, संगीत, एकांकीका, लोककला, कीर्तन, भारूड, चित्रकला, हस्तकला अशी भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी कला व नाट्यप्रेमींसाठी असून नागरिकांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.