PUNE Flood Update : सनसिटी-प्रायेज सोसायटी येथील प्रस्तावित पूल रखडल्यामुळे नाल्यावरील रस्ता गेला वाहून !

एमपीसी न्यूज : सिंहगड रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून सनसिटी-प्रायेज सोसायटीचा रस्ता वापरला जातो. परंतु, नाल्यावरून जाणाऱ्या या रस्त्याऐवजी छोटेखानी पूल उभारण्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेच्या लालफितीत अडकला. तो पूल रखडल्यामुळे नाल्याला आलेल्या भीषण पूरसदृश्य परिस्थितीमध्ये सनसिटी-प्रायेज सोसायटीचा रस्ता वाहून गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

सिंहगड रस्त्यावरून वडगाव बुद्रूक, धायरी, आंबेगाव पठार तसेच नऱ्हे येथे जाण्यासाठी दररोज जवळपास 15 ते 20  हजार नागरीक सनसिटी मधून जाणाऱ्या या शॉर्टकट रस्त्याचा वापर करत होते.

परंतु, दोन दिवसांपूर्वी परतीच्या पावसामुळे प्रचंड पाणी नाल्याद्वारे वाहताना मुळात हा रस्ता खचल्यामुळे वाहून गेला. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतूककोंडीत आणखी भर पडली आहे.

या प्रस्तावित पुलासंदर्भात महापालिकेच्या पथ विभागाच्या विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुलाच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया देखील सुरू आहे.

परंतु, पुल उभारणीच्या खर्चाला अंतिम मान्यता न मिळाल्यामुळे पर्यायी रस्त्यावर प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली नाही. परंतु, मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे हा रस्ता खचून काही भाग वाहून गेल्याचे निदर्शना आले आहे.

रस्ता पुन्हा पूर्ववत करण्याचे काम तातडीने सुरू झाले असून येत्या दोन दिवसासाठी वाहतुकीसाठी पुन्हा रस्ता खुला होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.