Pune : दोराबजी मॉलसमोरील 40 फूट खोल टाकीत मुलगी पडली, अग्निशमन दलाने केली सुखरुप सुटका

एमपीसी न्यूज – साधारण 40 फूट खोल असलेल्या रिकाम्या पाण्याच्या (Pune) टाकीत एक मुलगी  काल पडली.एनआयबीएम रस्त्यावरील रॉयल हेरिटेज मॉल (दोराबजी मॉल) समोर ही घटना घडली.टाकीत पडलेल्या मुलीचे नाव इनसीया इसाक इडतवाला (वय वर्ष 16, रा. बादशाहनगर,कोणार्क पुरम ,कोंढवा,  ) आहे.

Today’s Horoscope 05 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

काल ( दि.4 ) राञी साडेनऊच्या दरम्यान  एक मुलगी एनआयबीएम रस्ता, दोराबजी मॉलसमोर पाण्याच्या टाकीत पडल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळाली. वर्दि मिळताच दलाकडून कोंढवा खुर्द येथील अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहणी केली असता तिथे मोकळ्या परिसरात पाण्याच्या मोठ्या तीन टाक्या बांधल्या असून त्या सद्यस्थितीत रिकाम्या असल्याचे समजले. त्यामधील जवळपास 40 फुट खोल असणाऱ्या मोठ्या टाकीमध्ये वरुन पाहिले असता मुलगी जखमी अवस्थेत पडल्याचे दिसले.

अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे यांनी तातडीने स्वतः व जवान अनिकेत गोगावले यांनी सेफ्टी बेल्ट परिधान करत रश्शीच्या शिडीच्या साह्याने जवळपास 40 फुट खोल टाकीमध्ये प्रवेश केला तर इतर जवान वर थांबून साहित्याची देवाणघेवाण करीत होते. शिंदे यांनी मुलगी जखमी अवस्थेत असल्याचे पाहून नियंत्रण कक्षामार्फत रुग्णावाहिका व डॉक्टर यांची मागणी केली व लगेच मुलीला सेफ्टी बेल्ट लावून दलाकडील जाळीमध्ये वर पाठवण्यास सुरवात केली.

टाकीच्या वर असलेल्या जवानांनी मुलीला सुरक्षितरित्या टाकीबाहेर घेत रुग्णवाहिकेत ठेवले. त्याचवेळी उपस्थित डॉक्टरांनी तिला एक इंजेक्शन देत 108 या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात उपचाराकरिता रवाना केले. मुलीच्या पायांना व डोक्याला मार लागला असून जखमी अवस्थेत दलाच्या जवानांनी वेळेत तिला बाहेर काढत एकप्रकारे जीवदान देत आपले कर्तव्य बजावले आहे. सदर कामगिरी पुर्ण करण्यास एक तास अवधी लागला.

 

या कामगिरीत कोंढवा खुर्द अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे, वाहनचालक दिपक कचरे व फायरमन मोहन सणस, रवि बारटक्के, अनिकेत गोगावले, संतोष माने, रामराज बागल यांनी सहभाग घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.