Pune: दारूची तल्लफ स्वस्थ बसू देईना म्हणून त्यांनी फोडले देशी दारूचे दुकान; एलसीबीकडून तिघांना अटक

एमपीसी न्यूज – तल्लफ माणसाला काय करायला लावेल, याचा काही नेम नाही. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) तिघांना अटक केली आहे. या बहद्दरांनी लॉकडाऊनच्या काळात दारू प्यायला मिळत नसल्याने चक्क देशी दारूचे दुकानच फोडले. एक लाख 80 हजार रुपयांची दारू चोरून त्यातली काही दारू प्यायली तर काही विकली असल्याची कबुली या चोरट्यांनी दिली आहे.

राहुल सुरेश सप्ताले (वय 28), सचिन हरिभाऊ जगताप (वय 30), तुषार उर्फ रघु शंकर झेंडे (वय 29, सर्व रा. अशोक नगर भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिगवण येथील  सरकारमान्य देशी दारूचे दुकान फोडून चोरट्यांनी एक लाख 80 हजार रुपयांची देशी दारू चोरून नेली. याबाबत 13 एप्रिल रोजी भिगवण पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली की, भिगवण येथील तीन जणांनी हा गुन्हा केला आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे कसून चौकशी केली.

चौकशी दरम्यान आरोपी हे व्यसनाधीन असल्याचे समजले. तसेच सध्या लॉकडाऊनचा कालावधी सुरू असल्याने या काळात दारू विक्री बंद आहे. ‘आम्ही दारू प्यायल्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे आम्ही दारूचे दुकान फोडले. त्यातील काही दारू आम्ही पिऊन टाकली, तर काही दारू विकली. राहिलेली दारू पोलिसांनी जप्त केली आहे.

पोलिसांनी आरोपींना पुढील कारवाईसाठी भिगवण पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आरोपी राहुल हा अट्टल घरफोड्या करणारा आरोपी असून त्याच्यावर वालचंदनगर पोलीस ठाण्यात एक खून आणि दोन चोरीचे, भिगवण तीन आणि पिंपरी पोलीस ठाण्यात दोन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस कर्मचारी विजय कांचन, धिरज जाधव, अक्षय जावळे, अंकुश माने, संदीप लोंढे या पथकाने संयुक्तरित्या केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.