Pimpri : कोरोनाच्या संकटात 60 हजार गरजू नागरिकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मदतीचा हात

एमपीसी न्यूज – जगाभर सर्वत्र मृत्यूचे थैमान घालणाऱ्या कोरोना या प्राणघातक विषाणूशी आतापर्यंत भारत समर्थपणे तोंड देत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने आधी 21 दिवसांचा व नंतर 19 दिवसांचा ‘लॉकडाऊन’ घोषित केला. या कालावधीत नागरिकांना गैरसोय होऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तत्परतेने लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून नियोजनबद्ध योजना करून संपूर्ण शहरात मदतकार्य सुरु केली आहेत. आजवर 60 हजार गरजू नागरिकांपर्यंत संघाकडून विविध प्रकारचे मदतकार्य पोहोचविण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक डॉ. गिरीश आफळे यांनी दिली.

या कालावधीत आतापर्यंत गरजू नागरीकांची मुख्यतः दोन वेळच्या वेळच्या जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून बाहेरगावचे एकटे राहून शिक्षण घेणारे विद्यार्थी, नोकरी करणारे तरुण, झोपडपट्ट्या, नागरी वस्ती, भटक्या व्यक्ती मधील गरजू, विविध ठिकणी अडकलेले ट्रक ड्रायव्हर्स, एकटे किंवा जोडीने राहणारे जेष्ठ नागरिक, विवीध प्रांतातील बांधकाम मजूर यांना दोन वेळचे तयार 23 हजार 805भोजन डबे घरपोच मिळतील याची सोय केली आहे. तसेच ज्या गरजू  कुटुंबाना धान्य शिधा आवश्यकता आहे अशा कुटुंबाना 15 दिवस पुरेल इतके गव्हाचे पीठ, तांदूळ, तूरडाळ, मसाला पाकीट, खाद्यतेल, मीठ या वस्तू असणारे 2 हजार 107 किट घरपोच दिली आहेत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व परिवारातील इतर संस्थांनी शहरात विविध भागात अन्नछत्राद्वारे सुमारे 40 हजार व्यक्तींची भोजन व्यवस्था करण्यात येत आहे.

सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन व्हावे याकरिता भाजी बाजार, औषधाची दुकाने, किराणा दुकाने इत्यादी  जीवनावश्यक वस्तू दुकानांसमोर स्वयंसेवकांनी रात्रीतून संपूर्ण शहरात सुमारे पाच हजार ठिकाणी चुन्याने सुरक्षित अंतर पट्टे व चौकोन आखणी करून नागरिक व दुकानदारांची सोय केली आहे.

या संकटकाळात शहरातील रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याचे समजल्यावर संघाने शहरात विविध भागात सुमारे एक हजार रक्तदात्यांची नोंदणी करून रक्तदान शिबिरांची तयारी केली. परंतु रक्त पुरवठा सुरळीत झाल्याने सरकारच्या सूचनेनुसार रक्तदान शिबिरे स्थगित केली. तरी 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. शहरात विविध ठिकाणी ना नफा ना तोटा तत्वावर नागरिकांना भाजीपाला उपलब्ध करून देण्यात येत आहे. जेष्ठ नागरिकांना आवश्यक त्या सुविधा, त्यांची औषधे व भोजनाची सोय, इतर सामान्य कुटुंबियांनाही या परिस्थितीत धीर देऊन समुपदेशन करणे या कामात स्वयंसेवक व त्यांच्या कुटुंबियांनी पुढाकार घेतला आहे.

डॉ. गिरीश आफळे म्हणाले, “संपूर्ण शहरात संघाचे 300 स्वयंसेवक आरोग्य विषयक सर्व निकष व सरकारी नियमांचे पालन करून सेवा कार्यात सहभागी झाले आहेत. त्यांनी आजपर्यंत शहरातील सुमारे 60 हजार गरजू नागरिकांपर्यंत संघाच्या सेवांचा लाभ पोहचवला आहे. देशा समोरील राष्ट्रीय आपत्तीला सामोरे जाताना जनसेवा या सामाजिक जाणिवतेतून शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक निस्वार्थ भावनेने कार्यरत आहेत व आपण सर्व मिळून या संकटातून निश्चित सुखरूप बाहेर पडू असा विश्वास आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.