Pune: आशादायक! जगातील कोरोनाबाधित 20 लाखांपैकी पाच लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रसार आणि बळींची संख्या वाढत असतानाच एक आशादायक चित्र देखील पाहायला मिळत आहे. आतापर्यंत जगभरात तब्बल 5 लाख 10 हजार 46 कोरोनाबाधित रुग्ण उपचारांनंतर पूर्णपणे बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत. एकूण रुग्णांमध्ये कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढून 24.5 टक्के झाले आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 34 हजार 560 आहे. म्हणजे एकूण रुग्णांमध्ये मृत्यूंचे प्रमाण हे साडेसहा टक्के आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 66.5 टक्के असून केवळ एकूण कोरोनाबाधितांपैकी केवळ अडीच टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

कोरोना म्हणजे जागतिक महामारी, मानवजातीचा सर्वनाश अशा प्रकारची भीती लोकांच्या मनात बसलेली असताना वस्तुस्थिती स्पष्ट करणाऱ्या या आकडेवारीवर नजर टाकल्यास आपण कोरोनावर मात करू शकतो, हा विश्वास दृढ झाल्याशिवाय राहात नाही.

उपचार घेत असलेल्या 14 लाख 37 हजार 766 रुग्णांपैकी 13 लाख 86 हजार 606 रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. म्हणजेच एकूण कोरोनाबाधितांच्या तब्बल 66.5 टक्के कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांमध्ये हे प्रमाण तब्बल 96 टक्के आहे. गंभीर अथवा चिंताजनक असलेल्या जगभरातील रुग्णांची संख्या 51 हजार 160 म्हणजे केवळ चार टक्के आहे. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा लक्षात घेता हे प्रमाण जेमतेम अडीच टक्के असल्याचे दिसून येते.

सर्वाधिक कोरोनामुक्त रुग्णांची संख्या चीनमध्ये आहे. आतापर्यंत चीनमध्ये 77 हजार 816 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जर्मनीत 72 हजार 600 रुग्ण बरे झाले आहेत. स्पेनमध्ये 70 हजार 853, इराणमध्ये 49 हजार 933,  अमेरिकेत 48 हजार 701, इटलीमध्ये 38 हजार 092,  तर फ्रान्समध्ये 30 हजार 955 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. 

भारतात आतापर्यंत 12 हजार 370 कोरोनाबाधित सापडले असून त्यापैकी 1 हजार 508 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.  भारतात कोरोनाबाधित मृतांची संख्या 422 आहे. महाराष्ट्रात एकूण 2 हजार 916 कोरोनाबाधित असून त्यापैकी आतापर्यंत 295 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या बळींची संख्या 187 आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.