Pune : येत्या काही दिवसात वाढवणार मेट्रोच्या भूमिगत मार्गाचा नारळ

महामेट्रोच्या किक ऑफ बैठकीत निर्णय

एमपीसी न्यूज – महामेट्रो आणि टाटा-गुलेरमार्क कंपनीची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत मेट्रोच्या भूमिगत मार्गाची विस्तृत चर्चा करण्यात आली. यामध्ये येत्या काही दिवसात 5.019 किलोमीटर अंतरावरील भूमिगत मार्गाचे काम सुरु होणार आहे. त्यातील अॅग्रीकल्चर ग्राउंड ते फडके हौद या अंतरावरील काम टाटा-गुलेरमार्क या कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीकडून देखील तात्काळ कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

बैठकीसाठी गुलेरमार्कचे प्रकल्प समन्वयक एम्रे कायटन, टाटा प्रकल्पाचे एच ओ डी शैबल रॉय, महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम, भूमिगत मार्गाचे कार्यकारी संचालक अतुल गाडगीळ, महाव्यवस्थापक (जनसंपर्क) डॉ. हेमंत सोनावणे, जनरल कन्सल्टन्ट टीमचे प्रकल्प समन्वयक हुकूम सिंग चौधरी आदी उपस्थित होते.

पुणे मेट्रोची पीसीएमसी ते स्वारगेट ही मार्गिका क्रमांक एक आहे. या मार्गिकेची एकूण लांबी 11.570 किलोमीटर आहे. त्यापैकी 5.019 किमी मार्ग हा भूमिगत आहे. भूमिगत मार्गाचे काम हे दोन विभागात करण्यात येणार आहे. असून नुकतेच अग्रीकल्चर ग्राउंड ते फडके हौद या कामाची निविदा मंजूर करून टाटा व गुलेरमार्क या संयुक्त कंपनीला हे काम देण्यात आले आहे. या कामासंदर्भात टाटा-गुलेरमार्क कंपनीची किक-ऑफ बैठक घेण्यात आली. या बैठकीत भूमीगत मार्गाची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येणार आहे, त्याचा विस्तृत आराखडा महामेट्रोकडे सादर करण्यात आला.

भूमिगत कामामध्ये टनेल बोरिंग मशीन वापरण्यात येणार आहेत. त्याबरोबरच पायरिंग रिंग, ओव्हर हेड क्रेन, लोकोमोटिव्ह, हायड्रा यांसारख्या आधुनिक मशीन वापरण्यात येणार आहेत. या कंपनीला कास्टिंग यार्ड, ब्याचिंग प्लान्ट सुरु करावेत लागणार आहे. या कामात तीन हजार 392 रिंग वापरण्यात येणार आहे. या रिंगमुळे बोगद्याच्या आकार एकसारखा ठेवण्यात येतो. कामाचा उरक वाढविण्यासाठी महामेट्रोने आधीच शाफ्टचे काम सुरु केले आहे. लवकरच ते पूर्ण होऊन टनेलच्या कामाला सुरवात होणार आहे. टाटा-गुलेरमार्क अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांची पूर्ण टीम निर्धारित झाली असून लवकरच टनेल बोरिंग मशीन खरेदी करण्यासंबंधी वर्क ऑर्डर कंपनी देणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.