Pune : जून महिन्यात सर्वसाधारण सभा घेण्यासाठी हालचाली सुरु

Movements to general meeting begin in June

एमपीसी न्यूज – मागील दोन महिन्यांपासून तहकूब करण्यात आलेली पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा जून महिन्यात घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. एप्रिल, मे आणि जून महिन्यांत सलग तीन महिने अनुपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांचे पद रद्द होणार आहे. ते होऊ नये यासाठी जून महिन्यातील ही सभा घ्यावी, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे.

विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनीही फिजिकल डिस्टनसिंग पाळून सभा घेण्याची मागणी आयुक्त आणि महापौरांकडे केली आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

एप्रिल आणि मे महिन्यांची महापालिकेची सर्वसाधारण सभा कोरोनामुळे होऊ शकली नाही. लगेचच या दोन्ही महिन्यातील सभा तहकूब करण्यात आल्या. बीपीएमसी ऍक्ट 11नुसार मुख्य सभेला सलग तीन महिने गैरहजर राहिल्यास नगरसेवकांचे पद आपोआप रद्द होते.

एप्रिल, मे आणि जून महिन्यांत सलग तीन महिने अनुपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांचे पद रद्द होणार आहे. त्यामुळे या महिन्यातील सर्वसाधारण सभेला या 98 नगरसेवकांना उपस्थित राहणे बंधनकारक आहे. दि. 17 जून रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा आहे. त्यासाठी जास्तीत जास्त नगरसेवक उपस्थित राहण्याची गरज आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 24 मार्च पासून लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा फटका महापालिकेला मोठ्या प्रमाणात बसला आहे. उत्पन्नावर परिणाम होण्याबरोबरच शहरातील महत्त्वाची विकासकमेही थांबली आहेत.

महापालिकेचे 2020 – 21 चे अंदाजपत्रक हे 7 हजार 390 कोटींचे आहे. त्याची पूर्तता करणे आव्हानात्मक आहे. सध्या कोरोनाच्या संकट काळात नगरसेवकांनी महापालिकेकडे पाठ फिरविली आहे. आपापल्या प्रभागांत राहून जास्तित जास्त नागरिकांच्या संपर्कात राहण्यावरच भर देण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.