Pune: कोरोनामुळे संभाव्य आस्मानी संकटाकडे महापालिकेचे दुर्लक्ष, पावसाळी कामांना मुहूर्त कधी?

एमपीसी न्यूज – मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पुणे शहरात अक्षरशः हाहाकार माजला होता. अनेक नागरिकांचा त्यात बळी देखील गेला होता. यावर्षी पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर आहे. महापालिकेची सर्व यंत्रणा कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी व्यस्त आहे. त्यामुळे संभाव्य आस्मानी संकटाकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. पावसाळी कामांना मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

साधारण जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाला सुरुवात होते. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात नालेसफाईसह विविध पावसाळी कामे महापालिकेच्या वतीने करण्यात येतात, मात्र यावेळी सर्व प्रशासकीय यंत्रणा कोरोना नियंत्रणाच्या कामात व्यस्त असल्याने पावसाळी कामांना अजूनही सुरूवात झालेली नाही. पावसाळी कामे वेळेत झाली तर पावसाळ्यात नव्या संकटाला शहराला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाबरोबरच प्रशासनाने पावसाळी कामेही हाती घ्यावीत, अशी अपेक्षा पुणेकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पुण्याच्या पावसाचा काहीही भरवसा नाही. कधी तो कमी पडतो, कधी जास्त तर कधी तुफानपणे बरसतो. मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे दांडेकर पूल, सहकारनगर भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सध्या कोरोनाचे रुग्ण पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पुणे शहरातील कोरोनाचा रुग्णांचा आकडा 240 च्या आसपास गेला आहे. कोरोनाचे हे संकट वेळीच आटोक्यात आले नाही तर पावसाळ्यात आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुण्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतेच आहेत. आतापर्यंत 38 रुग्णांचा या रोगामुळे मृत्यू झाला. पुणे महापालिकेने कोरोना संदर्भातील उपाययोजना आणखी कडक केल्या आहेत. मार्केटयार्ड ते पुणे स्टेशन दरम्यान परिसर सील करण्यात आला होता. या भागात पोलिसांनी संचारबंदी लागू केली आहे. त्यानंतर महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी आणखी 22 ठिकाण सील करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या समोर ठेवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.